आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही, हे ६० वर्षीय हजराबी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. शुक्रवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात नातीसोबतच हजराबीसुद्धा दहावी उत्तीर्ण झाल्या. दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला अन् नात आनंदाने ओरडत आली.. आजी तू दहावी पास झाली.. तुला ५५.८८ टक्के मिळालेत. हा प्रसंग होता हर्सूल येथे राहणाऱ्या ६० वर्षीय हजराबी अहमद शेख यांच्या घरातील.
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नियमित प्रौढ महिला विद्यालयात जाणाऱ्या हजराबी शेतात काम करतात. त्यांचे लग्न लवकर झाले. घरची परिस्थिती खूप बेताचीच होती. मात्र त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. लग्न झाल्यानंतर तरी आपल्याला शिकायला मिळाले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. पण कौटुंबिक प्रपंचात ते राहूनच गेले. पण आयुष्याच्या शेवटच्या वळणावर का होईना, त्यांनी किमान दहावी उत्तीर्ण होण्याचा निश्चय केला. त्यांना पतीनेही साथ दिली. त्यांचे पती ड्रायव्हर म्हणून काम करत. पण हल्ली तब्येत बरी नसल्याने ते घरी असतात. पेपरच्या पहिल्या दिवशी तेच सोडवायला गेले होते.
हजराबी सांगतात, आज उत्तीर्ण झाल्यावर त्यांनीच प्रथम पेढेही आणल्याचा प्रसंग अविस्मरणीय आहे. त्यांनी साथ दिली म्हणून मी दहावीची परीक्षा प्रौढ महिला विद्यालय समर्थनगर येथून देऊ शकले. मला तीन मुले, एक मुलगी आहे. आज माझ्यासोबत माझी नात सादिया मैनाज ही देखील ७७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
तिच्यासोबतच मी परीक्षेची तयारी केली होती. आजी आणि नात दोघी पास झाल्याचा आनंद तर आहेच आता पुढे बारावीपर्यंत शिकायची इच्छाही हजराबींनी व्यक्त केली. या आनंदात आपल्या कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. प्रौढ महिला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळेच महिलांना चांगली संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कभी हार मत मानो
दरम्यान, एका परीक्षेत अनुत्तीर्ण झाले म्हणून आत्महत्या करणारे, कमी गुण मिळाले म्हणून निराश होणारे तरुणही आसपास पाहतो. त्यांना काय सांगाल असे विचारले असता हजराबी म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. पण हार के बाद भी तो जीत होती हैं. आयुष्य सुंदर आहे. इच्छा आणि मेहनत करा यश मिळते. नापास झाले म्हणून सर्व काही संपत नाही. मी शिकण्याची जिद्द बाळगली आणि उत्तीर्ण झाले, असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.