आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष मुलाखत:यंत्रणेत समन्वय नसल्याची पालकमंत्र्यांचीही कबुली, यापुढे क्वाॅरंटाइनवर भर देऊन काेराेना राेखणार : सुभाष देसाई

औरंगाबाद (हरेंद्र केंदाळे)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर आठवड्याला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची नियमित बैठक

मनपा, जिल्हा प्रशासन आणि पोलिस या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यानेच आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद शहराची सर्व सूत्रे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे दिल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. अर्थात, यंत्रणांमध्ये बेबनाव आहे असे म्हणता येणार नाही, पण काही प्रमाणात समन्वय नसल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यापुढे दर आठवड्याला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची नियमित बैठक होईल. शिवाय सर्व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार असल्याने परिस्थिती गंभीर न होता नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रश्न : अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. बेबनावही दिसून येतो. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे ?

देसाई : याला बेबनाव म्हणता येणार नाही. प्रत्येक यंत्रणा आपापले काम करत आहे. मात्र, काही प्रमाणात समन्वयाचा निश्चितच अभाव आहे. त्यामुळेच आता सर्व सूत्रे सुनील केंद्रेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दर आठवड्याला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची नियमित बैठक होणार आहे. त्यात सर्व माहिती आणि पुढील नियोजन करण्यात येणार आहे. आता सर्व उपाययोजना आणि नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार असल्याने परिस्थिती फार गंभीर न होता नियंत्रणात येईल.

प्रश्न : रोज होणाऱ्या मृत्यूमुळे शहरातील लोक घाबरलेले आहेत.

देसाई : होय, तशी परिस्थिती असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजी घेणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. वेळोवेळी सरकाने आणि प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हाच एक मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

प्रश्न : स्वॅबही कमी घेतले जात आहेत का?

देसाई : केंद्र शासन आणि डब्ल्यूएचओने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. त्यानुसारच स्वॅब घेण्यात येत आहेत.

प्रश्न : तरीही रुग्णांच्या रोज वाढणाऱ्या संख्येवर कसे नियंत्रण मिळवणार ?

देसाई : लागण झालेल्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना ताब्यात घेऊन तपासण्या केल्या जातील. त्यांना क्वॉरंटाइनही करणे आवश्यक आहे. त्यातूनच वाढणारी संसर्गाची साखळी तोडण्यात आणि पर्यायाने रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.

प्रश्न : आणखी काही उपाययोजना ?

देसाई : ज्या भागात निर्बंध घातलेले आहेत त्या भागात अधिक कडक निर्बंध घालणे. शिवाय तेथे आवश्यक सुविधा, औषधी आणि साहित्य देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. तशा सूचना केल्या आहेत.

प्रश्न : औषधी, मनुष्यबळ कमी पडत आहे...

देसाई : शासनाकडून लवकरच औषधी आणि मनुष्यबळ वाढवून दिले जाईल. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आरोग्य सचिव, आमदार, खासदार यांना तसे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...