आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘नवा विचार नवी दिशा’ उपक्रम:मराठा तरुणांना उद्योग, नोकरीसाठी मार्गदर्शन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजातील मुलांनी विविध राजकीय पक्ष-संघटनांत नुसतेच मोठेपणा घेऊन मिरवू नये, तर उच्च शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग व व्यवसायासाठी परिश्रम घ्यावे. गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठी हेच उपयुक्त ठरेल. यासाठी आम्ही ‘नवा विचार नवी दिशा’ हे अभियान राज्यभर राबवणार आहोत. बिझनेस कॉन्फरन्स घेणार आहोत. यातून प्रबोधन व सर्वतोपरी मदत केली जाईल, जॉब प्लेसमेंट पण होईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी प्रदेश महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष सोमेश्वर आहेर, जालना जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राहुल बनसोड, प्रशांत इंगळे, विकी राजे पाटील, विजय काकडे पाटील आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले की, मराठा तरुणांनी राजकीय पक्षांसाठी तोडफोड करणे बंद करावे. स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारावे. उच्च शिक्षण घ्यावे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र त्याच्या भरवशावर किती दिवस राहणार? यापेक्षा गरिबीवर मात करण्यासाठी व समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाबरोबरच व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी संधी कुठे आहेत, काय मदत लागेल ते करण्यास संभाजी ब्रिगेड तुमच्या पाठीशी उभी राहील. यासाठी आम्ही १९ बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या आहेत. या माध्यमातून ३०० मराठा तरुणांना राज्य, देश, परदेशातही बिझनेस सुरू करण्यासाठी मदत केली आहे. रोजगाराच्याही संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. औरंगाबादसह राज्यभरात टप्प्याटप्प्याने बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन होत आहे. संभाजी ब्रिगेडचा यंदा रौप्यमहोत्सव असल्याने त्याचीही तयारी सुरू आहे.

मानसिकतेत बदल करणे गरजेचे
मराठा समाजाने राजकारण्यांच्या षड‌्यंत्रालही बळी पडू नये. नि:संकोचपणे उद्योग-व्यवसायात उतरावे. यश-अपयशाची अगोदर चिंता करत बसू नये. गुणवत्तेने वाटचाल केल्याशिवाय यश मिळत नसते. सर्वांनी एकमेकांना मदत करत वाटचाल करणे नितांत गरजेचे आहे, असे मतही गायकवाड यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...