आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार-गुलाबराव पाटील:गंगापूर तालुक्यातील शौचालय अनुदानातील आर्थिक गैरव्यवहारावर होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे उत्तर

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वैयक्तीक स्वच्छतागृहाच्या अनुदान वाटपात अनियमितता झाली असेल तर दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (दि.14) विधान परिषदेत सांगितले. गंगापूर तालुक्यातील वैयक्तीक स्वच्छतागृहाच्या अनुदान वाटपात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

नेमके प्रकरण काय?

गंगापूर तालुक्यातील स्वच्छ भारत अभियान ग्रामीण फेज-2 अंतर्गत वैयक्तीक स्वच्छतागृहासाठी 1800 लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1149 अर्जदारांनी केलेल्या अर्जास वैयक्तीक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यासाठी मान्यता मिळाली.

स्वच्छतागृहाचे शासनाकडून मिळणारे प्रत्येकी 12000 रूपयाचे अनुदान गंगापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना न देता अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांना अनुदान वाटप केल्याचे दाखवून अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी विधी मंडळाकडे 10 जानेवारी 2023 रोजी तारांकित प्रश्न दाखल केला. 31 जानेवारी 2023 रोजी बॅलेट झाले. आपला भांडाफोड होणार असल्याचे कळताच अधिकार्‍यांनी फेब्रुवारी 2023 च्या शेवटच्या आठवाड्यात NFT व्दारे लाभार्थ्यांना अनुदान दिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

अनुदान कसे दिले?

शासन नेहमी KYC-DBT व्दारे लाभार्थ्यांना अनुदान देते मग NFT व्दारे अनुदान कसे दिले? असा प्रश्न उपस्थित करून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणी पुरवाठा व स्वच्छता मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी सदरील लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान द्यायला हवे होते हे मान्य करत सदरील प्रकरणात अनियमितता झाली असेल तर दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सभागृहात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...