आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली ते सावखेडा मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात तब्बल २०. ४५ लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी गुटखा व ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी गुरुवारीता. २३ पहाटे बासंबा पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुटखा नांदेड व लातुर येथे नेला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून एका ट्रकमध्ये मोठ्या संख्येने गुटख्याची पोते नांदेडकडे नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अभय माकणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, सुनील अंभोरे, राजू ठाकूर, किशोर सावंत, सावळे, टापरे, पायघन, खंडेराय नरोटे, यांच्या पथकाने बुधवारी ता. २२ दुपारीच वाहनांची तपासणी सुरु केली होती.
यावेळी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास एक दहा टायरचा ट्रक पोलिसांनी थांबविला. पोलिसांनी ट्रक चालक बाबुलाल कुशवाह याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याला पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय बळावल्याने पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन बासंबा पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधील साहित्याची तपासणी सुरु केली. यामध्ये ट्रकच्या आलीकडील बाजूला गोळ्या, बिस्कीटचे बॉक्स, टायर व इतर साहित्याचे पोते आढळून आले. मात्र ट्रकच्या मध्यभागी असलेल्या पोत्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी ट्रकमधील सर्व साहित्य खाली उतरवून तपासणी केली.
दरम्यान, राजनिवास पान मसाला गुटख्याचे १४.४० लाख रुपये किंमतीचे ४८ पोते तर विमल पान मसाला गुटख्याचे ६.१५ लाख रुपये किंमतीचे २० पोते आढळून आले. या गुटख्याची किंमत २०.४५ लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक बाबुलाल नथुलाल कुशवाह, क्लिनर भिम फुलचंद तडवी (रा. रुस्तुमपुर, जि. खंडवा, मध्यप्रदेश), शेख फैजान, महमद फारुख महमद शफी, विकी चौरसीया (दोघे रा. इंदौर), अकबर चाऊस, शेख खय्यू (रा. नांदेड) तसेच सलीम गोल्डन जर्दाचे व्यापारी यांच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मध्यप्रदेशातून नांदेडकडे जात होता गुटखा
सदर गुटखा इंदौर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीमधून ट्रकमध्ये भरण्यात आला होता. पोलिसांनी ट्रक चालक बाबुलाल व क्लिनर भिम तडवी याची चौकशी सुरु केली आहे. सदरील गुटख्या पैकी काही पोते नांदेडला तर काही पोते लातुरला उतरले जाणार होते. त्यामुळे आता लातुरला कोणाकडे गुटखा उतरला जाणार होता याची माहिती घेतली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.