आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटीतील निवासी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. पहिल्या दिवशी ४९६ पैकी २४८ डॉक्टर कामावर हजर हाेते. त्यांनी ओपीडीतील ११०० रुग्ण तपासले. शस्त्रक्रियाही झाल्या असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी सांगितले. आमच्या मागण्या मान्य न केल्यास इमर्जन्सी सेवा बंद करण्याचा इशारा मार्डचे अध्यक्ष अमोल चिंधे यांनी दिला आहे.
राज्यातील निवासी डॉक्टरांनी सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे, विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. घाटीत ओपीडी आणि आयपीडीमध्ये निवासी डॉक्टरांनी सेवा देणे बंद केले आहे. मात्र पहिल्या दिवशी संपाचा परिणाम जाणवला नाही. मार्डने दुपारी निदर्शने केली. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी संपकऱ्यांसाेबत चर्चा केली. त्यांनी दिवसभर रुग्णालयात फिरून रुग्णसेवेची माहिती घेतली. वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती ओपीडीमध्ये केली हाेती. त्यामुळे रुग्णसेवा सुरळीत हाेती, असा दावा कल्याणकर यांनी केला.
संपामुळे आपत्कालीन सेवेवर परिणाम झाला नसल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दावा आहे. मात्र, अत्यवस्थ रुग्णांना याची किंमत मोजावी लागत आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता एका अपघातात वाहनाखाली हाताचा चुराडा झालेल्या सविता जगताप यांना याचा प्रत्यय आला. सव्वाअकरा वाजता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सविता यांच्यावर केवळ प्राथमिक उपचार करण्यात आले. स्ट्रेचरवर निपचित पडलेला त्यांचा रक्तबंबाळ हात आणि नातलगांच्या हातात सलाइन अशा अवस्थेत दोन तास ताटकळल्यावरही त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले नाहीत. अखेरीस, त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.