आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना सोमवारपासून (दि. ६ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता शाळेच्या लॉगिनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेस २ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी २० फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या हॉलतिकिटांचे वितरण विद्यार्थ्यांना शाळांमधून करण्यात येणार आहे. शाळांच्या लॉगिनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी हॉलतिकीट डाऊनलोड करून घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक www.mahahsscboard.in संकेतस्थळावर पाहू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉलतिकिटांची ऑनलाइन प्रिंट देताना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना आकारू नये. प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकिटांमध्ये विषय व माध्यम यांच्यात बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी, असेही मंडळाने म्हटले आहे.
हॉलतिकीट हरवल्यास नवी प्रिंट देण्याची केली सूचना हॉलतिकीट गहाळ झाल्यास शाळांनी नवी प्रिंट काढावी. त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा लिहून ते विद्यार्थ्यास द्यावे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.