आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोली शहरात चाळीस वर्षा पासूनच्या अतिक्रमणांवर हातोडा, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील पलटन भागात ४० वर्षांपासून अतिक्रमण करून रस्ते अरुंद करणाऱ्या अतिक्रमण धारकांच्या अतिक्रमणावर अखेर पालिकेने धडाकेबाज निर्णय घेऊन हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.

हिंगोली शहरातील नारायण नगर ते पिपल्स बँक या रस्त्यावर मागील चाळीस वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण धारकांनी मागचापुढचा विचार न करता विजेचे खांबही अधिक्रमणात घेऊन विजेच्या खांबाच्या बाजूने बांधकाम केले आहे. तसेच काही जणांनी या ठिकाणी पक्के बांधकाम करून दुकाने देखील थाटली होती. 

 दरवर्षी अतिक्रमणात होणाऱ्या वाढीमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. काहीजणांनी तर पक्की बांधकामे करून बिनबोभाटपणे दुकाने सुरू केली होती. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले होते. या भागातील अतिक्रमण हटवताना अनेक वेळा पालिका प्रशासनावर दबाव तंत्र वापर करण्याचे प्रयत्नही झाले. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय थंडबस्त्यात पडला होता.

दरम्यान या रस्त्यावरून होणारी वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्याधिकारी पाटील, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, बाळू बांगर, डी.पी. शिंदे यांच्यासह पालिकेच्या पथकाने रस्त्याची मोजणी करून अतिक्रमणधारकांना तीन दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर काही जणांनी अतिक्रमण काढले तर काही जणांच्या अतिक्रमण कायम राहिले होते. सदर ही मुदत संपल्यानंतर पालिकेने मागील दोन दिवसापासून जेसीबी च्या साह्याने अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही पक्के बांधकाम देखील पाडण्यात आले आहेत. अतिक्रमणामुळे अरूंद झालेला  रस्ता आता अतिक्रमण हटावो मोहिमेमुळे अतिक्रमण मुक्त झाला असून या रस्त्याने ही मोकळा श्वास घेतला आहे. 

रस्ता बांधकामानंतर अतिक्रमण झाल्यास गुन्हे दाखल करणार :  रामदास पाटील पालिका मुख्याधिकारी

रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर याठिकाणी रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. या बांधकामानंतर पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधित अतिक्रमणधारकावर गुन्हे दाखल केले जातील. शहरातील इतर भागातील अतिक्रमण ही लवकरच हरविले  जाणार आहे.

0