आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणामागे पालकमंत्र्यांच्या जवळच्या एका नगरसेविका पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या नगरसेवकाचा कसून शोध घेत असून काल तो पोलिसाच्या तावडीतून निसटला, मात्र त्याच्या इतर चार सहका-यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून नुकतेच संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे 37 लाख 94 हजार 914 इतकी होती.
चोरीमागे पालकमंत्र्यांचा नगरसेवक
या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख (रा. परळी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा हा काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतून तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.
कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादंवि 461,380 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली.
परळीवर माफियांचे राज्य ?
गेल्या कांही महिन्यांपासून परळीत गुन्हेगारी वाढली असून विविध घटनांमुळे नागरिक व व्यापारी कायम दहशतीखाली वावरत आहेत. गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचेच अभय असल्याने दाद कुणाकडे मागायची ? शहरावर विविध माफियाच राज्य करतात की काय ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. वैद्यनाथच्या चोरी प्रकरणामागे कोण आहेत? हे उघड झाले आहे, त्यामुळे पदरमोड करून कारखाना चालवणारे एकीकडे आणि स्वतःच्या घरात लूट करणारे एकीकडे असे चित्र सध्या निर्माण झाल्याची नागरिकांत चर्चा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.