आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर आक्षेप घेत काही संघटना, राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध सुरू केला आहे. बुधवारी शहरात मनसे आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही आमने-सामने आले. सिडकोतील आयनॉक्स तापडिया सिनेमागृहात दुपारी १ वाजता या चित्रपटाचा शो होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षागृहाबाहेर जमून प्रेक्षकांना संरक्षण देत चित्रपटाचा शो सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडल्याचा दावा केला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केले. दरम्यान, या प्रकरणावर बोलण्यास थिएटरच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे गुरुवारी शो होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
कुठलाही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर झालेला असताे. असे असताना तो बंद पाडणे योग्य नाही. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे या सिनेमाचे शो मंगळवारी बंद पाडण्यात आले. मात्र आम्ही ते पुन्हा सुरू केल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण दिले नाही तर महाराष्ट्र सैनिक पुढे येईल. चित्रपटगृहांनी हा सिनेमा पुन्हा बंद केला तर आम्ही मनसे स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा मनसे शहर अध्यक्ष आशिष सुरडकर यांनी दिला.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनावर आधारीत असलेला चित्रपट बंद केल्या जातो, ही दुर्दैवी गोष्ट आहे. असे गजन गौडा पाटील म्हणाले. या वेळी जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, रामकृष्ण मोरे, चंदू नवपुते, विशाल बैद, प्रशांत इंगळे, प्रशांत अटोळे, शुभम बोराडे, मंदार देसाई, परमश्वेर सगर, अमित जैस्वाल, हेमंत जाधव, गणेश साळुंके, अमित दायमा आदींचा आंदोलनात सहभाग हाेता.दरम्यान, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना परत पाठवले. यापुढे ही जर चित्रपटगृहांना सिनेमा दाखवायचा असेल तर पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्या मते, चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला
‘हर हर महादेव’ चित्रपटात चुकीच्या इतिहास दाखवला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटवरही बंदी आणा, अशी भूमिका छत्रपती युवराज संभाजीराजे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, डॉ. शिवानंद भानुसे आदींनी घेतली आहे. बुधवारी आम्ही तापडिया चित्रपटागृहातील शो बंद पाडला. चुकीचा इतिहास दाखवणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला. समन्वयक सुनील कोटकर, अप्पासाहेब कुढेकर, नीलेश डव्हळे, अशोक मोरे, सचिन मिसाळ, रमेश गायकवाड, नंदू गरड, रेखा वाहटुळे, रेणुका सोमवंशी, ज्ञानेश्वर मोहिते, सचिन भाबट, मनोज तांबे, बाबासाहेब दाभाडे, सचिन खरात, अजय गंडे आदींनी हे आंदोलन केले.
गनिमी काव्याने तीव्र आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास असलेला चित्रपट दाखवू नये. आजपर्यंत हे आम्ही संयमाने आणि शांततेने सांगत आहोत. बुधवारी मनसेने सुरू केलेला शो आम्ही बंद पाडला. यापुढे तो दिसणार नाही. जर एखाद्या सिनेमागृहात शो दाखवला तर गनिमी काव्याने त्याचे परिणाम सर्व महाराष्ट्र बघेल. परिणामास संबंधित चित्रपटगृह चालक जवाबदार असेल. तरुणांचा संयम सुटलेला आहे. - सुनील कोटकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
शो बंद केला तर आम्ही संरक्षण देऊन सुरू करू
संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दबावाखाली शो बंद करण्यात आला होता. आम्ही येऊन तो सुरू केला. अशा प्रकारे गुंडगिरीने सिनेमाचा शो बंद करणे हे बरोबर नाही. पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण द्यायला हवे. अन्यथा मनसैनिक पुढे येऊन संरक्षण देण्यास तयार आहेत. हा सिनेमा जर पुन्हा बंद केला तर आम्ही पुन्हा येऊ व मनसे स्टाइलने जाब विचारू. - आशिष सुरडकर, शहर अध्यक्ष, मनसे
काहीच सांगू शकत नाही
सिनेमाचा शो दुपारी सुरू करण्यात आला होता. मात्र तो पूर्ण झाला की नाही. याबाबत मी काही सांगू शकत नाही. गुरुवारच्या शोबाबतही मला काही सांगता येणार नाही. याचे निर्णय वरिष्ठांकडून घेतले जातात. प्रेक्षक ऑनलाइन शोबाबत माहिती जाणून घेऊ शकतात. - ज्ञानेश्वर जाधव, व्यवस्थापक, आयनॉक्स तापडिया
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.