आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याची समीक्षा:हरीश खंडेराव हा आंबेडकरी विचार आहे : डॉ. मुलाटे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरीश खंडेराव यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारांची पताका आपल्या शिरावर घेऊन आंबेडकरी साहित्याची समीक्षा केली. आंबेडकरी चळवळ जगली. त्यामुळे हरीश खंडेराव हा एक आंबेडकरी विचार आहे आणि विचार कधीही मरत नसतात, असे मत ज्येष्ठ परिवर्तनवादी साहित्यिक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी व्यक्त केले. प्रा. अविनाश डोळस फाउंडेशनतर्फे आयोजित “दिशा चिंतनाची’ या हरीश खंडेराव यांच्यावरील आनंद चक्रनारायण संपादित ग्रंथाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. मंचावर डॉ. संजय मून, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. नवनाथ गोरे, संपादक आनंद चक्रनारायण यांची उपस्थिती होती. डॉ. मुलाटे म्हणाले, साहित्य चळवळीच्या प्रवासामध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली. दलित ते आंबेडकरवादी हेसुद्धा एक स्थित्यंतरच आहे.

या स्थित्यंतरातील दलित ही विकसनशील अवस्था होती. आंबेडकरवादी हा सर्वोच्च नव्हे तर अत्युच्च कळस आहे. या कळसावर पोहोचण्यासाठी स्वतः परीक्षण केल्याशिवाय शुद्धता येऊ शकत नाही. भलेही वैचारिक मतभेद असतील, परंतु पोहोचण्याचा मार्ग तर एकच आहे.

शेवटी आंबेडकरी विचारच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. मून यांनी केला. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी तर प्रास्ताविक प्रा. भारत शिरसाट यांनी केले. डॉ. सागर चक्रनारायण यांनी आभार मानले. या वेळी प्राचार्य डॉ. आर. के. क्षीरसागर, डॉ. कमलाकर गंगावणे, अप्पासाहेब जुंबडे, डॉ. मिलिंदराज बुक्तरे, डॉ. प्रज्ञा साळवे, भीमराव बनसोड, व्ही. के वाघ, शकुंतला धांडे, प्रा अरुण चंदनशिवे, रवींद्र वाकोडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...