आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:रावसाहेब दानवे यांच्या दबावामुळेच राजकीय संन्यास, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही खुलासा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्षवर्धन जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर अत्यंत गंभीर व धक्कादायक आरोप

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मागच्या आठवड्यात राजकारणातून संन्यास घेण्याची केलेली घोषणा सासरे व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या दबावातून केली होती, असा खुलासा हर्षवर्धन जाधव यांनीच शुक्रवारी व्हिडिओ निवेदनातून केला. दरम्यान, निवडणुकीनंतर ते घरी आलेलेच नाहीत व त्यांनी मधल्या काळात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, असा गौप्यस्फोटही यात आहे.

अध्यात्माच्या प्रभावामुळे राजकीय संन्यास घेत असून पत्नी संजनांना राजकीय वारसा सोपवत आहोत, अशी घोषणा हर्षवर्धन यांनी केली होती. आता एका व्हिडिओतून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर अत्यंत गंभीर व धक्कादायक आरोप केले.

गाड्या विकून निवडणूक लढलो : निवडणुकांसाठी रावसाहेब दानवे पैसे देतात असा लोकांचा समज आहे. पण आतापर्यंतच्या सर्व निवडणुका आपण बंगला, शेतजमीन विकून लढलो. २०१९ ची विधानसभा गाड्या विकून लढवली, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. माझ्याकडे संपत्ती कमी असल्यामुळे ते डिवचून बोलतात. निवडणुकीसाठी आपली जमीन अत्यंत कमी भावात दानवे यांनीच विकत घेतली होती, असेही त्यांनाच उद्देशून केलेल्या या निवेदनात हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

२००४ मध्ये शिवसेनेकडून उमेदवारीची आॅफर होती, पण दानवे यांनी ती माझ्यापर्यंत पोहोचूच दिली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती, पण त्यांना दानवे यांचा शब्द हवा होता. तोही दिला नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे. विधानसभेवेळी निवडणूक लढवणाऱ्या किशोर पवार यांना दानवे यांनीच पाठबळ दिले होते. आपल्या कार्यकर्त्यांना निधी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी दानवे यांच्यावर केला. तुमच्या इच्छेनुसारच आपण राजकीय वारसा आपली पत्नी संजना यांच्याकडे सोपवायला तयार झालो. त्यासाठी दिल्ली येथील बंगल्यात मला धमकावण्यात आले. ८० वर्षांच्या आईलाही जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, असेही आरोप या व्हिडिओत आहेत. निवडणुकीनंतर आपण घरी आलो नाही तरी कोणी एक फोन करूनही विचारले नाही. त्या काळात नैराश्यातून आपण अंतुर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो, असेही जाधव म्हणतात. दरम्यान, याबाबत दानवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

....तर आत्महत्या करीन

या व्हिडिओमुळे संतापून तुम्ही माझा आणखी छळ करायचा प्रयत्न केला तर आत्महत्या करून घेईन. त्यासाठीच आपल्याजवळ सायनाइडच्या गोळ्या सोबत ठेवल्या आहेत. पण मरण्यापूर्वी तुमचे सगळे व्हिडिओ व्हायरल करीन आणि मग तुम्ही कुठलेच राहणार नाहीत, अशी धमकीही हर्षवर्धन यांनी या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे. आता आपण कोचीनला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...