आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 वर्षांनी स्वगृही:गुप्तहेर समजून पाकिस्तानी जेलर नेहमी छळायचा पण मीही करारा जवाब द्यायचे; पाकच्या कोठडीतील कटू आठवणींना हसीना बेगम यांनी दिला उजाळा

सुमीत डोळे/फेरोज सय्यद | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
घरी परतलेल्या हसीना बेगम यांना पेढा भरवून स्वागत करताना कुटुंबीय. (छाया : मनोज पराती) - Divya Marathi
घरी परतलेल्या हसीना बेगम यांना पेढा भरवून स्वागत करताना कुटुंबीय. (छाया : मनोज पराती)
  • असा घडला घटनाक्रम : गृह मंत्रालयाने शहर पोलिसांना दिली माहिती

१८ साल तक पाकिस्तान मुझे हिंदुस्तान का जासूस समजता रहा. पर मैंने कभी भी जासूसी नहीं की.. मैं वहाँ रिश्तेदार को मिलने गयी थी. वहाँ जेल में मुझे हमेशा टेढे सवाल पूछ पूछ के हैरान कर देते थे. पर मैंने भी उसे टेढे जवाब देने शुरू किये. एक लेडी अफसर ने मुझे ‘तमीज’ सिखाने की काेशिश की, लेकिन मैंने उसे भी करारा जवाब दिया था. दो महीने की सजा के नाम पर मुझे १७-१८ साल उन्होंने जेल में रखा,’ अशा भावना लाहोर तुरुंगात राहिलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केल्या.

औरंगाबादच्या रशीदपुऱ्यातील हसीना यांचा उत्तर प्रदेशमधील सहारनपूर (नवाब का किला) येथील दिलशाद अहमद यांच्याशी विवाह झाला हाेता. विवाहानंतर लाहाेरमध्ये असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी त्या २००२ मध्ये पाकिस्तानात गेल्या. मात्र, नातेवाइकांची भेट होऊ शकली नाही. नातेवाइकांचा शाेध घेत असताना त्यांची कपडे, कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेली. त्यात पासपोर्ट व इतर ओळखपत्रही गेले. संशयितरीत्या फिरताना पाकिस्तानच्या पाेलिसांनी हसीना यांना पकडले व तुरुंगात डांबले. तब्बल अठरा वर्षांची शिक्षा भाेगून डिसेंबरमध्ये त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात भारताला यश आले. इकडे पतीने दुसरा घराेबा गेल्याचे कळल्यानंतर हसीना यांनी माहेरी आैरंगाबादेत येण्याची इच्छा व्यक्त केली. गेेला महिना त्या अमृतसरमध्येच हाेत्या. २६ जानेवारी राेजी हसीना आपल्या रशीदपुऱ्यातील माहेरी परतल्या. त्यांच्या भाच्यांनी व इतर कुटुंबीयांनी हसीना यांचे स्वागत केले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

पाकिस्तानी नोटा काढल्या अन‌् म्हणाल्या... :

हसीना आठवून आठवून कोठडीतील कटू अनुभव सांगत होत्या. मानसिक छळ, प्रवासामुळे त्या थकलेल्या आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या दोन वाक्यांमध्ये तफावत येत होती. परंतु थोडा वेळ थांबून त्या पुन्हा दुसरा विषय काढत होत्या. तुम्हाला त्यांनी मारले का? या प्रश्नावर ‘नहीं, फुल बरसाते थे,’ असे उत्तर त्यांनी दिले. पण थाेड्या वेळाने ‘नाही मारले, खाेटे आराेप कशाला करायचे?’ असे स्पष्टीकरण हसीना यांनी दिले. बाेलता बाेलता हसीना यांनी आपल्या बटव्यातून पाकिस्तानी चलनाच्या नाेटा काढला अन‌् माेजू लागल्या. ८०० रुपये भरले. ‘या नोटा घे, मला काहीतरी आण,’ असे त्यांनी नसीबला सांगितले. पण या नाेटा इकडे चालत नसल्याचे त्याने सांगितले तेव्हा हसीना यांनी कपाळावर हात मारला.

असा घडला घटनाक्रम : गृह मंत्रालयाने शहर पोलिसांना दिली माहिती

> वर्षभरापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने औरंगाबाद पोलिसांना संपर्क साधून हसीना यांची ओळख पटवण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थानिक पाेलिसांच्या विशेष शाखेने त्यांच्या रशीदपुऱ्यातील नातलगांचा शाेध घेतला.

> सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार व त्यांच्या टीमने नातेवाइकांचे जबाब नाेंदवले. हसीना यांच्या नावाची बँक खात्याची कागदपत्रेदेखील सापडली. शहरात त्यांच्या नावावर जमीन असून त्याची रजिस्ट्रीही सापडली. ही सर्व कागदपत्रे पोलिसांनी केंद्र सरकारला पाठवली. केंद्र सरकारकडून ती पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानने हसीना यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतला.

> गुप्तहेर असल्याचे आराेप खाेटे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर हसीना यांची १८ डिसेंबर २०२० रोजी पाकिस्तान सरकारने मुक्तता केली. त्यांना लाहाेरवरून इस्लामाबादमध्ये नेऊन पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले. तेथून अटारीत (वाघा बॉर्डर) बीएसएफच्या जवानांकडे सुपूर्द करण्यात आले.

> नियमानुसार अमृतसर प्रशासनाने ताब्यात घेत हसीना यांना त्यानंतर गुरुनानक देव रुग्णालयात दाखल केले. नंतर औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधला. सिटी चौक पोलिस ठाण्याचे दाेन कर्मचारी त्यांना २६ जानेवारी रोजी घेऊन शहरात दाखल झाले. त्यांचे भाचे जैनोद्दीन किश्मी व नसीब खान यांनी त्यांना रेल्वेस्थानकावरून घरी आणले.

मी न्यायाधीशांवर ओरडले, ‘तुम्ही माणुसकी विसरलात’

‘२००२ मध्ये अटकेनंतर मला कोट लखपत सेंट्रल तुरुंगात ठेवले हाेते. अठरा वर्षे अंधाऱ्या कोठडीत डांबले. मी निर्दोष असल्याचे, गुप्तहेर नसल्याचे वारंवार सांगत राहिले, पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. माझी बॅग शाेधण्याची विनंती केली. मात्र, कुणीही मदत केली नाही. तेथील न्यायालयानेदेखील माझे ऐकले नाही. असह्य झाले तेव्हा मी ‘साहब, आप इन्सानियत भूल गये’ असे न्यायाधीशांना आेरडून बाेलल्याचे हसीना सांगतात.

‘जेलर अनेकदा माझी चौकशी करायचे. ‘आपको किसने भेजा, आप किसके लिए काम करती हो’ हा एकच प्रश्न वारंवार विचारून छळ करत होते. गुप्तहेर असल्याची कबुली देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, पण मी ते मान्य केले नाही. अखेर मला न्याय मिळाला. आज माझ्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पाेहाेचले याचा आनंद आहे,’ असे नातीला मांडीवर घेत हसीना सांगत हाेत्या.

सोलापूरचे सत्यवान मात्र अद्याप प्रतीक्षेतच : साेलापूर जिल्ह्यातील सत्यवान यांचीही तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झाली. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून ते अमृतसरमध्ये आश्रयास असून नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक प्रशासनाने दोन वेळेस सोलापूर प्रशासनाला पत्रव्यवहार केला. महाराष्ट्र पोलिसांनी ते इथले नागरिक असल्याचे मान्य केले असले तरी त्यांच्या नातेवाइकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी मात्र प्रयत्न केलेले नाही. राजदूतावासाकडून त्यांच्या पासपोर्टवर सुरुवातीला आंध्र प्रदेशचा उल्लेख करण्यात आला हाेता. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात अडचण आली. आता ते साेलापूरमधील खुर्दवाडीचे असल्याचे समाेर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...