आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे देवगिरी महाविद्यालयातील ३३ वर्षीय प्रा. सुहास गायके (रा. धारूर, जि. बीड) यांना ओरियन सिटी केअरमध्ये भरती केले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. गायके ब्रेन डेड झाल्यानंतर ओरियन सिटी केअरचे डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी त्यांची पत्नी आणि त्यांचे भाऊ यांच्याशी चर्चा करत त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्रदय, लिव्हर, दोन्ही किडनी आणि दोन्ही डोळे अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले आहे. औरंगाबादचे हे २७ वे अवयवदान आहे.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास शिऊरकर यांनी सांगितले की, गायके यांना महाविद्यालयातच त्रास झाला होता. त्यांच्या तोंडाला फेस आला होता. त्यानंतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी त्यांना दवाखान्यात भरती केले. विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. गेल्या नऊ वर्षांपासून ते देवगिरी महाविद्यालयात होते. तसेच बाईक क्लबचेदेखील इन्चार्ज होते. त्याच्या मृत्युमुळे आम्हाला सर्वांना धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
या अवयवदानात सुहास गायके यांची पत्नी विजया गायके, आई, वडील, भाऊ शुभम गायके यांनी अवयवदानात महत्त्वाची भूमिका बजावली. शुभम गायके हे पुण्यात डॉक्टर आहेत. तर त्यांची बहीणदेखील डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण परिस्थिती समजावून सांगण्यात आल्याचे वट्टमवार यांनी सांगितले. याबाबत शुभम गायके यांनी सांगितले की, आम्ही सर्व कुटुंबीयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. आमच्यावर मोठे संकट कोसळले आहे. यामधून काही अवयवदानातून चार जणांना जीवदान मिळेल.
गायके कुटुंबाशी चर्चा करून घेतला निर्णय
डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी सांगितले की, कोरोनामूळे अवयव दान प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता ही प्रकिया सुरू झाली आहे. या रुग्णांची पण कोरोना टेस्ट करण्यात आली. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांची पत्नी, आई, वडील, भाऊ यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रिलायन्स हॉस्पिटल मुंबई यांना ह्रदय पाठवण्यात आले, तर पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला लिव्हर, तर बजाज आणि सिग्मा हॉस्पिटल यांना किडनी देण्यात आली. तसेच बजाज हॉस्पिटलला दोन्ही डोळे पाठवण्यात आले. गायके हे मूळचे बीड जिल्ह्यातील धारूर येथील रहिवासी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.