आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी महिलेचा मृत्यू:नांदेड, पैठणला जोरदार पाऊस; वीज पडून भोकरला महिला ठार

नांदेड/टाकळी अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (८ सप्टेंबर) जोरदार पाऊस झाला. यात पैठण तालुक्यातील टाकळी अंबड परिसरातील टाकळी अंबड, घेवरी, हनुमाननगर, विठ्ठलनगर, हिरडपुरी, तुळजापूर, नवगाव, आपेगाव येथे शेतीला मोठा फटका बसला. तर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे वीज पडून ललिता पोले (३८) या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला, तर पती सुभाष पोले जखमी झाले.

टाकळी अंबड येथे तर कपाशी, मूग, मका, तूर, सोयाबीनच्या शेतात पाणी साचले होते. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पावसाने २१ दिवस दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. टाकळी अंबड परिसरात गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दररोज पावसाची हजेरी राहत आहे. मात्र बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह सकाळी १० वाजेपर्यंत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस यंदा झालाच नाही; पण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारी नांदेड शहर व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे वातावरणही थंड झाले. वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती भोकर येथील तहसीलदारांच्या वतीने देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...