आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृत्व आणि कर्तृत्व:या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू!

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सप्टेंबर २००६’ हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय महिना आहे. माझ्या कर्तृत्वाची आणि मातृत्वाची नोंद या महिन्याने घेतली. त्यामुळे काळाचा हा क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेलेला आहे. गरोदरपणाचा नववा महिना पेलत २ सप्टेंबर २००६ रोजी अधिव्याख्याता म्हणून सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात मी रुजू झाले. अवघ्या चार दिवसांत ६ सप्टेंबर २००६ रोजी माझ्या गोंडस कन्यारत्नाला मी जन्म दिला. दोन्हीकडे पहिलटकरीण असलेल्या माझ्या मनाची घालमेल माझ्या मैत्रिणी नक्कीच समजू शकतात.

डिसेंबर २००४ मध्ये लग्न झालेले. त्यामुळे खरं तर मी अजून लग्नाच्याच नवखेपणात होते. या नवखेपणाचे विशेष कारण होते माझी लग्नाच्या तीन वर्षे आधीपासून सुरू असलेली पीएचडी. पहिले प्राधान्य अभ्यासाला. त्यामुळे त्यातून वेळ मिळाला की मग संसार वगैरे करायचा. त्या अभ्यासाचे सर्वांनाच कौतुक होते. पण तो लग्नापूर्वीच आटपायला हवा होता, हे तितकेच प्रामाणिक मत. पण माझ्या दीर्घसूत्री स्वभावातून हा अभ्यास लग्नानंतरही तीन वर्षे चालला. त्यातच नवी नोकरी, पहिलं बाळंतपण. मग काय तारांबळ उडाली असेल जिवाची! तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. मात्र सासर-माहेरच्या माणसांमुळे, स. भु. मधील सर्वांच्या सहकार्यामुळे, या काटेरीपणातून सुगंधी फुलंच माझ्या आयुष्यात उमलली.

मी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच माझा चेहरा चिंताक्रांत झाला होता. ‘माझ्या पीएचडीचे काय’ ही माझी चिंता ऐकताच डॉ. अलका चोबे मॅडम खळखळून हसल्या होत्या. “काय गं तुम्ही आजकालच्या मुली! मीसुद्धा माझी डॉक्टरकी मुलं सांभाळतच केली,’ या चोबे मॅडमच्या वाक्याने मला धीर आला. तरी माझी ही चिंता मी माझ्या पीएचडीच्या मार्गदर्शिका डॉ. लता मोहरीर मॅडमकडे व्यक्त केलीच. बातमी ऐकूनच त्यांना आनंद झाला. त्या म्हणाल्या, “आई होणं हा जगातला सर्वात सुंदर अनुभव आहे. काही काळजी करू नको. काम सुरू ठेव. आवश्यक त्या वेळी सहा महिन्यांच्या रजेची तरतूद आहे. ते नंतर वाढवून मिळतील. उगाच या ताणात आईपणाचा आनंद घालवू नकोस. एंजॉय युवर मदरहुड.’ या गुरूपदेशाने आणि आदेशाने मात्र मी खरंच रिलॅक्स झाले. दर महिन्यात होणारी गर्भाची वाढ, बाळाच्या जाणवणाऱ्या हालचाली याचा आनंद मी मुक्त मनाने घेऊ शकले.

नव्या नोकरीमुळे आणि तिथल्या परिस्थितीजन्य गरजेनुसार बाळंतपणानंतर अवघ्या सव्वा महिन्यात मला रुजू व्हावे लागले. मात्र तत्कालीन प्राचार्य डॉ. बी. वाय क्षीरसागर आणि उपप्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांनी स्पष्ट सांगितले, “सध्या तुझे तास घेण्याशिवाय दुसरे कोणतेही काम तुला करायचे नाही. ११.१५ ला तास संपले की तू निघू शकतेस.” या दिलाशावरच अक्षरश: ११.३० ला माझे पाऊल घरात असायचे. घरची आघाडी सासूबाई आणि सासऱ्यांनी उत्तम तऱ्हेने सांभाळलेली असायची. चार तासांच्या विरहानंतर मला बिलगून जाणाऱ्या तान्हुल्याला कवटाळत मी मातृत्वाचे सुख उपभोगायचे.

या काळात वात्सल्याने बहरलेले आपले कोवळे मन हळवे झालेले असते. मी तर वर्गातल्या भावुक कविताही अनेक वेळा रडत शिकवायचे. ‘तन्मयतेने शिकवावे पण आपण रडू नये,’ असे माझ्या गुरुजनांचे प्रेमळ संदेश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझ्यापर्यंत पोहोचायचे. मी स. भु. ची विद्यार्थिनी असल्यामुळे ते माझे माहेरच. त्यामुळे बाळाला कसे सांभाळावे, कमी वेळेत जास्त काम कसे करावे, व्यस्ततेतही नीटनेटके कसे राहावे अशा सल्ल्यांपासून, ‘मूल रडतच असते’ अशा प्रॅक्टिकल विचार करण्यापर्यंत अनेक गोष्टी सहजच कानावर येत होत्या.

सगळेच दिवस सारखे नसतात. मूल दिसामासाने वाढते तशा घरात आणि बाहेर आपल्याकडूनच्या अपेक्षा वाढत असतात. नव्याचे नऊ दिवस ओसरून तुमचे व्यवस्थित रूटीन लागावे, अशी रास्त आणि ठोस अपेक्षा व्यक्त केली जाते. सर्वांचे सहकार्य असले तरी बाई म्हणून, आई म्हणून आपण स्वत: अपुऱ्या पडत आहोत ही एक मनाला बोच लावणारी जाणीव आतल्या आत कुरतडत राहते. कधी-कधी त्याचे पडसाद आजूबाजूला उमटत राहतात. कायम ऐसपैस पसरलेले घर आपल्या नीटनेटकेपणाला आव्हान देत राहते. ना आपण मुलांना वेळ देऊ शकत, ना नोकरीला न्याय अशी कुतरओढ करणारी द्विधा अवस्था होते. आपणच आपल्याला दोष द्यायला लागतो. अशा वेळी घरची-बाहेरची काही टपलेली माणसे आपला न्यूनगंड वाढून पद्धतशीर खच्चीकरण कसे होईल, यासाठीही प्रयत्न करू शकतात. इथे महत्त्वाचा ठरतो तो, आयुष्याचा जोडीदार व त्याची सकारात्मक भूमिका. ज्याच्या भरोशावर आपण सर्वस्व अर्पण केलेले असते त्याने तरी आपल्याला समजून घ्यावे, वेळप्रसंगी मदत करावी, अशी माफक अपेक्षा असते. ती पूर्ण झाली तर संसाराच्या लटकत्या दोरीवरून महिला प्रगतीच्या दिशेने जातात. पण तोच जर साशंक आणि प्रतिकूल असेल तर महिलेसाठीचा संघर्ष तीव्र होतो. माझ्या आशयने मात्र खऱ्या अर्थाने माझे आयुष्य ‘आशयपूर्ण’ केले. जोडीदार आपल्या बाजूने उभा आहे हे पाहिल्यावर सर्वच नातेवाईक आपसूक सरळ राहतात. म्हणून संसारात हा विश्वास, प्रेम, सामंजस्य असेल तरच गृहस्थाश्रम सत्कारणी लागतो. संसारात लुडबुड नाही, पण जिथे कमी तिथे आम्ही हा वरिष्ठांचा हक्काचा दिलासा असेल तर आदर आणि काळजी दोन्ही संसारात आनंदाने नांदतात. भारतीय कुटुंबपद्धतीचे वैशिष्ट्य हे की प्रत्येक जण एकमेकांसाठी आंतरिक ओढीने, कर्तव्यभावनेने करत राहते. मात्र त्याचे आभारप्रदर्शन कुणी करत फिरत नाही आणि उपकारभावनाही वागवत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या ‘प्लीज’, ‘थँक्यू’ या संस्कृतीत वावरत, मराठीत नाही हो विनम्रतेची ही सभ्यता, असे टोमणे मारत फिरणाऱ्या आपल्याला आपल्या संस्कृतीतील ‘ऋण’ काय असतं हे समजून घेतलं पाहिजे. जे प्रत्यक्ष दिले जात नाही आणि ज्याची परतफेड होऊच शकत नाही असे मातृऋण, पितृऋण, गुरुऋण - या अव्यक्त गोष्टी आहेत जाणिवेच्या पातळीवरच्या, संवेदनेनं जोपासल्या जाण्याच्या !

संपर्क : vrundavdeshpande@gmail.com प्रा. डॉ. वृंदा देशपांडे-जोशी

बातम्या आणखी आहेत...