आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास नगरकर ठरला सामनावीर:हायटेक स्ट्रायकर्स खासदार चषकाचा मानकरी ; प्रदीप जगदाळेला मिळाली दुचाकी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयजे क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित खासदार चषक स्पर्धेत कर्णधार प्रदीप जगदाळेच्या नेतृत्वाखाली हायटेक इन्फ्रा स्टायकर्स संघाने विजेतेपद पटकावले. अली कासीम हायटेकचे मालक आहेत. आमखास मैदानावर झालेल्या फायनलमध्ये हायटेकने एमआयटी क्युस्ट एक्सलन्स संघावर ७ गड्यांनी मात केली. या लढतीत विकास नगरकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एमआयटीचा संघ १४.३ षटकांत ९२ धावांवर ढेपाळला. संघाला फायनलमध्ये मोठे आव्हान उभारता आले नाही. प्रत्युत्तरात हायटेक स्ट्राकयर्सने ११ षटकांत ३ गडी गमावत ९४ धावा करत विजयी लक्ष्य गाठले. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रवीण देशेट्टी अवघ्या दुसऱ्या चेंडूवर एक करत बाद झाला. दुसरा सलामीवीर विकास नगरकरने १३ चेंडूंत ३ चौकारांसह १७ धावा काढल्या. नैफने २३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. कर्णधार प्रदीप जगदाळेने २७ चेंडूंत ६ सणसणीत चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. पुन्हा एकदा त्याने संघाला तारले. मो. आमेर ४ धावांवर नाबाद राहिला. एमआयटीकडून कर्णधार इशांत राय, धीरज थोरात व योगेश चौधरी यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

विनायक, मुस्तफा, मुसा, अविनाश उत्कृष्ट खेळाडू स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज विनायक चौघुले, उत्कृष्ट गोलंदाज मुसा पटेल, क्षेत्ररक्षक मुस्तफा शाह, यष्टिरक्षक अविनाश मुके आणि मालिकावीर प्रदीप जगदाळे (२८७ धावा, १० बळी) ठरला. प्रदीपला मान्यवरांच्या हस्ते दुचाकी भेट देण्यात आली. विजेत्या हायटेक संघाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार इम्तियाज जलील, अनिल इरावणे, अहमद जलील, स्पर्धा प्रमुख बिलाल जलील, शेख हबीब यांच्या हस्ते ५ लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. उपविजेत्याला ३ लाख रुपये बक्षीस देण्यात आले.

नगरकर, नायरची भेदक गोलंदाजी तत्पूर्वी, एमआयटीच्या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. शशिकांत पवारने २१ चेंडूंत २ चौकारांसह २१ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर सतीश भुजंगेने १२ चेंडूंत २ चौकार खेचत ११ धावा केल्या. सतीश व शशिकांत जोडीने ३१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर संघाचा डाव गडगडला. विकास नगरकर व ऋषिकेश नायरने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर एकामागून एक गडी तंबूत पाठवला. राहुल जोनवाल ८ धावांवर परतला. योगेश चौधरीने १३ चेंडूंत २ चौकार लगावत १५ धावा जोडल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावत सामनावीर ठरलेला वैभव चौगुले अवघ्या ४ धावांवर बाद झाला. हायटेकच्या विकास नगरकरने १९ धावा देत ४ गडी टिपले. ऋषिकेश नायरने १४ धावांत ३ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...