आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेप:घाटीतील भरती वय लपवले; चौकशीनंतर कारवाईची शिफारस ; 48 वर्षे उलटलेल्या महिलेला अनुकंपाची नोकरी

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासनाने वयाची ४८ वर्षे उलटलेल्या महिलेला पतीच्या जागी अनुकंपावर नोकरी दिली. पतीच्या पेन्शनचा लाभ घेत असतानाही तिला नाेकरी देण्यात आली. आपल्या सासूने वयाचे खाेटे प्रमाणपत्र दाखवून ही नोकरी मिळवली, असा आरोप तिच्या विधवा सुनेने केली. त्यावर घाटी प्रशासनाने चौकशी केली मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. घाटीत चतुर्थश्रेणी म्हणून कार्यरत सुभाष प्रताप बनसोडे यांचे २ सप्टेंबर २०१६ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांचा मुलगा नीलेश यास फेब्रुवारी २०१७ मध्ये अनुकंपावर सेवेत घेण्यात आले. पण जानेवारी २०१९ मध्ये नीलेशचेही अकाली निधन झाले. मग नीलेशची पत्नी अर्चना हिने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. त्यावर घाटीने नीलेशची आई कविता यांचा सांभाळ करण्याच्या अटीवर अर्चनाला मार्च २०१७ मध्ये सेवेत सामावून घेतले. सासू कविता व नणंद रूपाली यांची शपथपत्राद्वारे संमतीही घेतली. मात्र जानेवारी २०२१ मध्ये सासू कविता यांनी सून (अर्चना) आपला सांभाळ करत नसल्याची तक्रार करून मला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी घाटीकडे केली. मग मार्चमध्ये घाटीने अर्चनाची सेवा खंडित करून सासू कविता यांना तिच्या जागी रुजू केले. सुनेच्या तक्रारीनंतर बनवाबनवी उघड : सुनेच्या तक्रारीनंतर घाटी अधिष्ठातांनी चौकशी समिती स्थापन केली. समितीने कविता यांनी शिक्षण घेतलेल्या शिवाजी हायस्कूल किन्होळा (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथे जाऊन शाळेचा दाखला तपासला. त्यात सुनेच्या तक्रारी प्रमाणे कविता यांची जन्मतारीख ५ मे १९७२ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, नियुक्तीच्या तारखेला कविता यांचे वय ४८ वर्षे ११ महिने होते. त्यामुळे त्या अनुकंपा नोकरीसाठीही पात्र नसल्याचे चौकशीत सिद्ध झाले. चौकशी समितीने ३० डिसेंबर २०२१ रोजी अहवाल देऊन कविता यांच्यावर फसवणुकीची कारवाई करण्याची शिफारस केली. या अहवालाला ५ महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला तरी कारवाई झालेली नाही, अशी सुनेची तक्रार आहे. याप्रकरणी लाड पागे समितीतील सदस्य, सचिव व अध्यक्षांवरही खटले दाखल करण्यात यावेत. अन्यथा उपोषण, जनआंदोलन केले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी अधिष्ठातांना निवेदनातून दिला आहे. लाड पागे समितीच्या कार्यपद्धतीला विरोध शाळेतून त्यांनी खोटा दाखला मिळवला, जन्मतारीख बदलली कविता यांनी नाेकरी मिळवण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून माहेरच्या शाळेचा दाखला जोडला. त्यात खोटे वय दाखवल्याचा सुनेचा आराेप आहे. अनुकंपा नोकरीसाठी शासनाच्या १९९६ मधील निर्णयानुसार ४५ वर्षे कमाल वयाची मर्यादा आहे. या दाखल्यावर कविता यांनी जन्मतारीख ५ मे १९७९ (४१ वर्षे ११ महिने) दाखवली. वास्तविक खऱ्या प्रवेश निर्गम उताऱ्यानुसार त्यांची मूळ जन्मतारीख ५ मे १९७२ आहे, असा सुनेचा दावा आहे.

कारवाईची प्रक्रिया सुरू, गुन्हा दाखल होईल

संबंधित महिलेने वय घटवून नोकरी मिळवल्याची तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. तक्रारीत तथ्य आढळले. यात शासनाची फसवणूक झाली असल्याने कायदेशीररीत्या गुन्हा दाखल होईल. प्रशासन या प्रकरणात नक्कीच कारवाई करेल. तशी प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. भारत सोनवणे, अध्यक्ष, लाड पागे समिती.

बातम्या आणखी आहेत...