आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • High Voltage In Pimpaldari Burns Electrical Appliances In The Village, Causing Loss Of Rs 15 Lakh Villagers Allege That The Electricity Company Did Not Pay Attention Despite Making A Complaint

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पिंपळदरीत उच्च विज दाबाने गावातील विद्युत उपकरणे जळाली, 15 लाखांचे नुकसान; तक्रार करूनही वीज कंपनीने लक्ष दिले नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे वीज पुरवठा असूनही गावकऱ्यांना मागील तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. उच्च वीज दाबामुळे गावातील विद्युत उपकरणे जळाल्याने 15 लाखांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात वीज कंपनीकडे तक्रार करूनही याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे सुमारे 6000 लोकसंख्येचे गाव असून गावात 700 पेक्षा अधिक घरे आहेत. त्यापैकी 600 घरांना विज पुरवठा देण्यात आला आहे. गावात वीज पुरवठ्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी एक रोहित्र दिड वर्षापासून जळाले असून एकाच रोहित्रावर गावाला वीज पुरवठा केला जात आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून गावात अचानक 400 व्होल्टने विज पुरवठा होत आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच गावातील सर्वच घरांमधील विद्युत उपकरणे जळाली असून यामध्ये पंखे, कुलर्स, मिक्सरचा समावेश असून काही जणांचे ट्यूब व विजेचे बल्ब देखील फुटले आहेत. एवढेच नव्हे तर गावात बसविण्यात आलेले 53 पथदिवे देखील बंद झाले आहेत. पथदिवे बंद झाल्याने गावात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून गावकरीही उच्च दाबाने वीजपुरवठा होत असल्याने बल्ब, ट्यूब व इतर उपकरणे सुरु करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी वीज कंपनीकडे तक्रार केल्यानंतरही तीन दिवसांपासून एकही कर्मचारी गावात फिरकलाच नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे.

विशेष म्हणजे मार्च महिन्यात वीज देयकाच्या थकबाकी वसुली करण्याच्या कारणावरून वीज कंपनीने गावाचा वीज पुरवठा 15 दिवस खंडीत केला होता. यावेळी गावकऱ्यांनी सुमारे ३.५० लाख रुपयांचे वीज देयक भरले होते. या देयक भरल्याच्या पावत्याही गावकऱ्यांना देण्यात आलेल्या नसल्याने गावकऱ्यांतून वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. वीज कंपनीने देयक भरलेल्या पावत्या द्याव्यात तसेच गावाला योग्य दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.

15 लाख रुपयांचे नुकसान : बापुराव घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळदरी

गावात उच्च दाबाने वीज पुरवठा सुरु झाल्याने विजेवर चालणारी उपकरणे जळून सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 6000 लोकसंख्येसाठी एकही वीज कर्मचारी गावाला देण्यात आला नाही. त्यामुळे खाजगी व्यक्तीकडूनच फ्यूज टाकणे व इतर कामे करून घेतली जात आहेत.

आर्थिंग केबल तुटल्याचा परिणाम : अश्‍विनकुमार मेश्राम, कनिष्ठ अभियंता, वीज कंपनी उपविभाग औंढा नागनाथ

गावात वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राचे आर्थिंग केबल तुटल्याने गावाला उच्च दाबाने वीज पुरवठा होत असावा. नेमके काय अडचण आहे हे पाहण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात आले आहे. लवकरच गावाला योग्य दाबाने वीज पुरवठा होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser