आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गांचा आढावा:क्षमता नसतानाही मोठी कंत्राटे घेतल्यामुळे महामार्गांची कामे रखडली : अशोक चव्हाण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यातील 24 राष्ट्रीय महामार्गांचा घेतला व्हीसीद्वारे आढावा

पुरेशी आर्थिक व तांत्रिक क्षमता नसताना मोठी कंत्राटे घ्यायची आणि मिळालेली कामे इतर कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रकार मागील काही वर्षांमध्ये वाढीस लागला आहे. परंतु, यातून कामांचा दर्जा खालावत असून कामे वर्षानुवर्षे रखडू लागली आहेत. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. जे कंत्राटदार वेळेत व निविदेतील निकषानुसार दर्जेदार काम करणार नाहीत, त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. या वेळी संथगतीने सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रखडलेल्या कामांबाबत त्यांनी संबंधित कंत्राटदारांना चांगलेच खडसावले व ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

मराठवाड्यातील २४ राष्ट्रीय महामार्गांच्या रखडलेल्या कामांचा आढावा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू असलेल्या औरंगाबाद विभागातील पैठण ते शिरूर, शिरूर ते खर्डा, खरवंडी ते राजुरी, शिऊर ते वैजापूर - येवला, औरंगाबाद ते सिल्लोड, चिखली ते धाड, परळी ते पिंपळा दहीगुडा, पानगाव-धरमपुरी-परळी -इंजेगाव, कोल्हा ते नसरतपूर, नसरतपूर ते बारसगाव, सरसम ते कोठारी, अर्धापूर ते हिमायतनगर, हिमायतनगर ते फुलसांगवी, उस्माननगर ते कुंद्राळ या १४ रस्त्यांचा आढावा तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अहमदपूर-पिंपळा जंक्शन,पिंपळा जंक्शन ते मांजरसुंभा, मांजरसुंभा ते चुंबळी फाटा, जहिराबाद ते निलंगा-लातूर, मंठा ते परतूर, परतूर ते माजलगाव, केज ते कुसळंब, शिरड शहापूर ते वसमत, जिंतूर ते परभणी आणि आष्टमोड-टिवतियाल (लातूर ते उदगीर) या महामार्गांच्या कामाचाही आढावा या वेळी घेण्यात आला.

या रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदारांना चव्हाण यांनी सूचना केल्या. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, उपसचिव राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता के.टी. पाटील हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय महामार्गचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्यासह औरंगाबाद विभागातील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंते हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...