आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवित्र कुराण व हदीसने दाखवलेल्या आदर्श जीवनशैलीला आत्मसात करून मानवतावादाचा पुरस्कार करा, हीच इस्लाम धर्माची शिकवण आहे, असे मार्गदर्शन चितेगाव येथील इज्तेमामध्ये उलेमांनी केले. पहिल्या दिवशी पाच उलेमांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रासह अनेक देशांतून जवळपास १ लाखापेक्षा जास्त संख्येने आलेल्या भाविकांनी या ठिकाणी पाच वेळची नमाज अदा केली. प्रत्येक नमाजनंतर उलेमांनी भाविकांचे प्रबोधन केले.
चितेगाव येथे तीनदिवसीय इज्तेमासाठी दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. दिल्ली, पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथून आलेल्या उलेमांनी “बयाण’ (भाषण) केले. लग्नकार्यात उधळपट्टी नको, आईवडिलांची सेवा, पती-पत्नीचे अधिकार, मुलांचे संगोपन, हलाल कमाईचे महत्त्व, प्रबोधनाची गरज, नमाजचे महत्त्वासारखे कुराण व हदीस यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अरबीतील अर्थ उर्दू भाषेत उलगडून सांगितले.दरम्यान, रविवारी रात्री ९.३० वाजता दुआ होणार आहे. त्यानंतर १ हजार जमात निघणार आहे.
कशी असते दिनचर्या
पहाटे चार वाजता तहाजुदची नमाज अदा करण्यात येते. त्यानंतर सहा वाजता फजरची नमाज. दुपारी दीड वाजता जोहरची नमाज. पाच वाजता असर. साडेसहा वाजता मगरीब व आठ वाजता इशाची नमाज सामूहिकरीत्या अदा करण्यात येते. या सर्व नमाजांच्या मधल्या वेळांमध्ये नित्य कार्य, उलेमांचे मार्गदर्शन होते.
शनिवारी या पाच उलेमांनी केले मार्गदर्शन
शुक्रवारी जुम्माच्या नमाजनंतर नांदेडच्या मौलाना साद अब्दुल्लाह, असरच्या नमाजनंतर औरंगाबादचे मौलाना समयुद्दीन, मगरीबनंतर मौलाना मोबीन, तर शनिवारी पहाटे फजर नमाजनंतर नांदेडचे मौलाना साद अब्दुल्लाह यांनी मार्गदर्शन केले.
रविवारी ३०० जोडप्यांचा सामूहिक विवाह, दुआ
रविवारी इज्तेमामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च न करता ३०० जोडप्यांचे सामूहिक विवाह करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पेंडॉलही तयार करण्यात आले आहे. यात शहरासह जिल्ह्यातील वधू-वरांचे नाव नोंदणी पूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर रात्री ९.३० दुआ होईल.
एकात्मतेचे प्रतीक; जागोजागी अल्पोपाहारची व्यवस्था
इज्तेमासाठी अनेक हिंदू बांधवांनी जमिनी दिल्या आहेत. चितेगावला इज्तेमाची संधी प्राप्त झाली ही आमच्या तालुक्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया उपसरपंच बसवेश्वर नजन यांनी दिली. गावातील हिंदू बांधवही त्या ठिकाणी सेवा देण्यासह येत आहेत. गावकरी मधुकर डोईफोडे, बाबूराव तागड म्हणाले, इज्तेमा काय असतो हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलाे आहाेत. चितेगाव रस्त्यावरील पंजाबी जंक्शन धाब्याच्या शीख बांधवांनी अल्पोपाहारची व्यवस्था केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.