आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली शहर पोलिस ठाण्याचा पुढाकार:हिंगोलीत कायदा व सुव्यवस्था सांभाळत रक्तदान शिबीर घेऊन पोलिसांनी जपले सामाजिक दायीत्व

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे या शिबीरात पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनीही रक्तदान केले.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनी गुरुवारी ता. 8 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीर आयोजित करून समाजिक दायीत्व देखील जपले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी ६० जणांनी रक्तदान केले होते. हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत संचारबंदी व इतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. या शिवाय कोविड केअर सेंटर, शासकिय रुग्णालय या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी चोविस तास काम करीत आहेत.

दरम्यान, सोमवारी ता. 5 पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे हे रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी रक्तबाटल्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात सोमवारी केवळ 2 रक्तबाटल्या शिल्लक होत्या. तर दररोज किमान 15 ते 20 रक्तबाटल्या लागतात. मात्र शिबीर नसल्याने रक्तबाटल्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर कच्छवे यांनी तातडीने रक्तदान शिबीर आयोजित करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून शहर पोलिस ठाण्याच्या विश्रामगृहात रक्तदान शिबीराला सुरवात झाली. विशेष म्हणजे या शिबीरात पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनीही रक्तदान केले. या शिवाय 30 पोलिस कर्मचारी व इतर नागरीकांनीही या शिबीरात सहभाग नोंदविला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 60 जणांनी रक्तदान केले होते.

या शिबीरामुळे शासकिय रुग्णालयात काही दिवसा पर्यंत का होईना रक्तबाटल्यांचा तुटवडा भरून निघाला आहे. तर पोलिसांनी कायदा व सुवस्था सांभाळत सामाजिक दायीत्व दाखवून दिल्याने पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे. या शिबीरासाठी पोलिस निरीक्षक कच्छवे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे, उपनिरीक्षक नितीन केणेकर, मनोज पांडे, साईनाथ अनमोड, जमादार शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, दिलीप बांगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

रक्तबाटल्यांचा तुटवडा कमी करण्याचे प्रयत्न - राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक,
शासकिय रुग्णालयात असलेला रक्तबाटल्यांचा तुटवडा कमी करण्यासाठी पोलिस विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे व पथकाने आयोजित केलेल्या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. नागरीकांनीही आता सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करावे.

बातम्या आणखी आहेत...