आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिती गंभीर:हिंगोली जिल्ह्यात यंत्रणा ‘ऑक्सिजन’वर; ऑक्सिजनचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त; 550 बेड पण उपचार 594 रुग्णांवर

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वॉर्डात विनाकारण थांबलेल्या १२ जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी
  • हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डामध्ये भेट देऊन पाहणी करताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेड फुल्ल झाले आहेत. सद्य:स्थितीत शासकीय यंत्रणेत ५५० बेड असताना तब्बल ५९४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आॅक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता पुढील काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी २५२ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत हिंगोलीत कमी रुग्ण आढळत होते. पण गेल्या काही दिवसांत हा आकडा २०० पार झाला आहे. सध्या जिल्ह्यात ११२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना औषधोपचार मिळावा यासाठी ५५० ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आले होते. मात्र सध्या ५९४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

इतर ठिकाणी नव्याने बेड वाढवण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शासकीय रुग्णालयात २१०, नवीन कोविड हॉस्पिटलमधील ९० बेड फुल्ल झाले आहेत. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची क्षमता असताना या ठिकाणी १५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर वसमत उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडची क्षमता असताना ६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्राथिमक आरोग्य केंद्र कवठा येथे ५० बेड असून तेथे १५ जणांवर तर औंढा येथे ५० बेड असून तेथे २७ जणांवर उपचार सुरू आहेत. आता ऑक्सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांना कवठा व औंढा येथे पाठवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत दररोज किमान २५० ते ३०० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. तर पुरवठादाराकडून ९०० ते १००० सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दर दोन दिवसांआड ऑक्सिजन टँकर मागवावे लागत आहे. चाकण, बुटीबोरी (नागपूर) येथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तर मागील आठवड्यात झारखंड राज्यातून ऑक्सिजन मागवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

लातूरमध्ये एकाच दिवसांत १९१६ रुग्ण
मराठवाड्यामध्ये काेराेनाच्या रुग्ण संख्येचा उच्चांक गाठला जात अाहे. मंगळवारी लातूर जिल्ह्यामध्ये कहर झाला असून १९१६ रुग्ण तर, नांदेडमध्ये १६६४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. बीडमध्ये १ हजार १८ तर जालन्यामध्येही हा अाकडा ८६४ वर पाेहाेचला. परभणीत ५३२ रुग्ण अाढळले व १५ जणांचा मृत्यू झाला. तर नांदेडमध्ये २७ काेराेनाबाधितांचा जीव गेला. हिंगाेलीत ८ तर जालन्यात ७ जणांचा मृत्यू झाला अाहे.

वॉर्डात विनाकारण थांबलेल्या १२ जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी
शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डामध्ये रुग्णांशिवाय इतर कोणीही दिसता कामा नये याची दक्षता घ्या, अशा शब्दांत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी शासकीय रुग्णालय प्रशासनाला फटकारले. वॉर्डमध्ये रुग्णांसोबत विनाकारण थांबलेल्या १२ जणांना लिंबाळा येथील कोविड केअर सेेंटरमध्ये रवाना केले. कोविड वॉर्डच्या परिसरात बंदोबस्तही वाढवला आहे. कोविड वॉर्डातील रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक थांबत असून या नातेवाइकांचा शहरात व गावाकडे वावर होत असल्याने फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...