आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अखेर कामठा फाटा येथील पस्तीस कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; गावी जाण्यास पोलिसांनी दिली परवानगी

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कळमनुरी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून राजस्थानी 35 कुटुंबे पडली होती अडकून

कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे मागील दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या राजस्थानी कुटुंबांना गावी जाण्यास पोलिस विभागाने परवानगी दिल्यानंतर शनिवारी या कुटुंबांना रवाना करण्यात आले. तब्बल दोन महिने एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या कुटुंबांना परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे राजस्थानातील टोक येथील ३५ कुटुंबे मागील दोन महिन्यांपासून आली होती. मनोरंजनाचे खेळ करून तसेच जडीबुटी विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र २२ फेब्रुवारी रोजी रेशमा गुड्डू शहा (१३) मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास चालवला होता.

पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने सर्व कुटुंबांची चौकशी केली. त्यानंतर राजस्थानात जाऊन काही जणांची चौकशी केली होती. या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत या कुटुंबांना कामठा फाटा येथे थांबण्यास सांगितले होते. मात्र कामठा फाटा येथून बाहेर निघण्यास परवानगी नसल्यामुळे या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रकार लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या भटक्या व विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी, श्रीकांत वाघमारे यांनी लोकवर्गणी जमा करून त्यांना संसारोपयोगी साहित्य व धान्याचे वाटप केले.

तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनीही या कुटुंबांना मदत केली. दरम्यान, सध्या कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या कुटुंबांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या कुटुंबांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास परवानगी द्यावी यासाठी ठाकूरसिंग बावरी यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी या कुटुंबांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी दिली. यामध्ये सदर कुटुंब ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणावरून आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती देण्याची अटही या कुटुंबांना टाकली आहे.

दरम्यान, शनिवारी सदरील कुटुंबांना लोकवर्गणीचे १७ हजार रुपये जमा करून गावाकडे रवाना करण्यात आले. सदर रक्कम ठाकूरसिंग बावरी यांनी कुटुंबांच्या हवाली करून त्यांना रवाना केले. मागील दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या या कुटुंबाला गावी जाण्यासाठी परवानगी मिळताच कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. कामठा फाटा येथे अडकलेल्या राजस्थानी कुटुंबांना लोकवर्गणी जमा करून रवाना करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...