आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोविड तपासणी, एका तासात 30 पैकी 2 जण पॉझीटिव्ह

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे - राकेश कलासागर ,पोलिस अधिक्षक

हिंगोली शहरात पोलिस यंत्रणेने शुक्रवारी ता. 16 सकाळपासूनच थेट कारवाई सुरु केली असून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. यामध्ये एका तासात 30 जणांची चाचणी केली त्यापैकी दोन जण पॉझीटिव्ह आले असून त्यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हयात मागील पंधरवाड्यापासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. या शिवाय 1200 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने बेड उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या काळात सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस विभाग, पंचायत विभाग, नगर पालिका प्रशासनाकडून योग्य नियोजन केले जात आहे. मात्र गुरुवारी ता. 15 सकाळी काही वेळ बाजारात गर्दी झाल्याचे चित्र होते.

त्यानंतर आज पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी थेट कारवाईला सुरवात केली. पोलिस अधिक्षक कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, सरदारसिंह ठाकूर, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, वाहतुक शाखेचे निरीक्षक श्रीमनवार यांच्या पथकाने शहरामध्ये तसेच शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारला. यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसून आल्याने पोलिस अधिक्षक कलासागर यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार नांदेड नाका व महात्मा गांधी चौकात अवघ्या एका तासात 30 जणांना पकडून त्यांची रॅपीड चाचणी करण्यात आली.

विशेष म्हणजे पायी फिरणारे, दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांनाही थांबवून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये दोघे जण पॉझिटिव्ह निघाले असून त्यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर मोहिम ता. 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे - राकेश कलासागर ,पोलिस अधिक्षक
हिंगोली शहरासह जिल्हयात संचारबंदीच्या काळात नागरीकांना विनाकारण फिरणे बंद केले पाहिजे. किरकोळ कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर आता पोलिस विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्या संदर्भातील सुचनाही जिल्हयातील ठाणेदारांना दिल्या आहेत. त्यामुळे आता नागरीकांनीच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन घरातच थांबावे.

बातम्या आणखी आहेत...