आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:जिल्हयात 44 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले, रुग्णांची संख्या 62 वर

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेनगाव तालुक्यातील खुडज गावात सर्वेक्षण सुरु करणार

हिंगोली जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांचा अहवाल शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झाला असून त्यात तब्बल 44 रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे यंत्रणा हादरून गेली असून यामध्ये बहुतांश रुग्ण बाहेरगावाहून आले असल्याने त्यांना क्वारंटाईन केले होते. मात्र सेनगाव तालुक्यातील खुडज येथील 9 रुग्णाबाबत संभ्रम असल्याने या गावामध्ये सर्वेक्षणाची तयारी सुरु करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता चांगलीच वाढू लागली आहे. शनिवारी सकाळी शासकिय रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 6 रुग्ण कोरोना पाॅझीटिव्ह आले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली होती. त्यानंतर रात्री उशीराने पुन्हा नवीन अहवाल शासकिय रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. यामध्ये तब्बल 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

या रुग्णांमध्ये सेनगाव तालुक्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या 13 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये 10 व्यक्ती मुंबई येथून तर 3 व्यक्ती दिल्ली येथून सेनगाव तालुक्यात आल्या होत्या. त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवण्यात आले होते. या 13 जणांमध्ये सेनगाव तालुक्यातील खुडज येथील 9, बरडा येथील 3 तर सुरजखेडा येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

या शिवाय हिंगोली येथील लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटरमधील 31 जणांचा समावेश आहे. सदरील रुग्णांपैकी 22 जण मुंबई, 4 जण औरंगाबाद, 1 रायगड तर 1 बिदर (कर्नाटक) येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 2 रुग्ण भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील असून 1 समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण 50 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बहुतांश जण बाहेरगावाहून आले असून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याने सामाजिक संक्रमण साखळीची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र खुडज येथील रुग्णाबाबत संभ्रम असल्याने आता हे गाव सील करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.

सध्या जिल्ह्यात 62 रुग्ण पॉझिटिव्ह

हिंगोली जिल्हयात आता पर्यंत 151 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 89 रुग्णांवर उपचार केल्यानंतर हे रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आता 62 रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

176 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबीत

जिल्ह्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये 312 जणांना ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 176 जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. त्यामुळे आता या अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...