आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:​​​​​​​महिलेच्या मृत्यूनंतर अडीच महिन्यांनी आला आयसोलेट होण्याचा संदेश, प्रशासनाच्या गलथान कारभाराचा असाही नमुना

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सदर संदेश आश्‍चर्यकारक - त्र्यंबक मेसाजी पोघे हिंगोली

हिंगोली शहरात एका महिलेचा अडीच महिन्यापुर्वी कोविडने मृत्यू झाला त्याची नोंदही शासकिय रुग्णालयाकडे आहे. मात्र तब्बल अडीच महिन्यानंतर शनिवारी दुपारी त्या महिलेच्या कुटुंबियांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून महिलेचे रॅपीड चाचणीसाठी नमुने घेतले असून आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारामुळे शासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हिंगोली शहरातील चंपाबाई मेसाजी पोघे (80) यांना कोविडचा त्रास होत असल्याने त्यांना ता. 24 मार्च रोजी शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सीटीस्कॅन केल्यानंतर त्यात त्यांचा स्कोर 18 पेक्षा अधिक आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

चंपाबाई यांना रुग्णालयात दाखल करतांना त्या ठिकाणी सर्व माहिती देऊन त्यांच्या मुलाचा भ्रमणध्वनी क्रमांक नमुद केला होता. मात्र ता. 31 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकारामुळे पोघे कुटुंबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान, शनिवारी ता. 12 दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाच्या भ्रमणध्वनीवर माय गव्हर्नमेंट ॲपवरून संदेश पाठविण्यात आला. त्यात चंपाबाई यांचे स्वॅब नमुने रॅपीड चाचणीसाठी घेण्यात आले असून हा संदेश जपून ठेवण्याचे कळविले.

तर नमुन्याची तपासणी करून अहवाल येई पर्यंत त्यांना आयसोलेट होण्याचा सल्लाही देण्यात आला. सदर संदेश वाचून पोघे कुटुंबियांची स्थिती मात्र चांगलीच अडचणीची झाली. अडीच महिन्यापुर्वी चंपाबाई पोघे यांचा मृत्यू झाल्यानंतर आयसोलेट होण्याचा सल्ला देण्याचा आलेला संदेश आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारा ठरला आहे.

सदर संदेश आश्‍चर्यकारक - त्र्यंबक मेसाजी पोघे हिंगोली
आई चंपाबाई पोघे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा ता. 31 मार्च रोजी मृत्यू झाला. त्याची नोंदही शासकिय रुग्णालयाकडे आहे. त्यानंतरही असा संदेश प्राप्त होणे आश्‍चर्यकारक आहे. हा प्रकार मानवी चुकीचा की यंत्र नादुरुस्तीचा आहे याचा शोध घेऊन त्याची तातडीने दुरुस्ती केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...