आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक प्रकरण:महाराष्ट्र 10 तर उत्तर प्रदेशात नोकरीसाठी आरोपी तरुणांकडून उकळायचे 5 लाख

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीत माहिती उघड, एक मुख्य आरोपी अद्यापही फरार

हिंगोली पोलिसांनी तरुणांच्या फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून आता हळूहळू माहिती उघड होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीला लावण्यासाठी ५ ते १० लाख रुपये, तर उत्तर प्रदेशात ८० हजार ते ५ लाख रुपये उकळले जात असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. यामध्ये एक मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा व वसमत पोलिसांनी देशभरात तरुणांना नोकरीचे अामिष दाखवून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या अभय रेडकर (दिल्ली), संतोषकुमार सरोज (उत्तर प्रदेश), गौतम फणसे (ठाणे) यांची चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या पथकाकडून या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये गौतम फणसे याने तब्बल २१ जणांना फसवल्याचे समोर आले आहे. त्याने मुंबई महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावतो असे सांगत फसवणूक केल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून महाराष्ट्रातील आणखी किती तरुणांना फसवले याची माहिती घेतली जात आहे. दुसरीकडे संतोषकुमार सरोज हा उत्तर प्रदेश व दिल्ली भागात पांडे हे आडनाव लावून राहत होता. तो सरोज या आडनावापेक्षा पांडे या आडनावानेच प्रसिद्ध असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुंबई व इतर भागामध्ये निवासस्थान मिळवण्यासाठी तो नाव व आडनाव बदलून राहत असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील तरुणांना हेरण्यासाठी त्यांचे स्थानिक पातळीवर एजंट होते. या एजंटच्या माध्यमातून ते तरुणांची फसवणूक करीत होते. महाराष्ट्रातील तरुणाकडून नोकरीला लावण्यासाठी रक्कम घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम स्थानिक एजंट स्वतःसाठी काढून घेऊन पुढे देत होता. याप्रमाणे किमान तीन ते चार टप्पे असून प्रत्येक जण आपापला हिस्सा काढून घेत होता. शेवटच्या टप्प्यावरील व्यक्तीकडे दोन ते तीन लाख रुपये पोहोचत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पथके स्थापन केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील चार जण पोलिसांच्या रडारवर
स्थानिक पातळीवर बेरोजगारांना हेरून गंडवण्याचे प्रकार करणाऱ्या चार जणांची माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. हे चौघेजण राज्यातील पोलिसांच्या रडारवर असून ते मागील काही वर्षांपासून या आरोपींच्या सतत संपर्कात होते. फसवणूक प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर पुरावे गाेळा करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...