आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दहावी निकाल:शासकिय आदिवासी आश्रमशाळेचा गुणवत्तेचा हिंगोली पॅटर्न, चारही शाळांचा निकाल शंभर टक्के, राज्यातील पहिलाच प्रकल्प

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ३० आदिवासी प्रकल्प कार्यालयांमधून हिंगोली जिल्ह्यातील चारही शासकिय आदिवासी आश्रमशाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. राज्यात एकाच प्रकल्पातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के असलेला कळमनुरी आदिवासी प्रकल्प राज्यात पहिला प्रकल्प आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत २४५ विद्यार्थ्यांपैकी ८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी दहावी निकालाचा हिंगोली पॅटर्न निर्माण झाला आहे.

राज्यात ३० आदिवासी प्रकल्प कार्यालय असून त्यातून ५४५ शासकिय आदिवासी आश्रमशाळा आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हयात कळमनुरी प्रकल्पांतर्गत चार शाळा आहेत. या शाळांचे मागील काही वर्षातील इयत्ता दहावीचे निकाल जेमतेमच लागत होते. गोटेवाडी आश्रमशाळेचा निकाल तर चार वर्षापुर्वी शुन्य टक्के लागला होता. तर इतर शाळांचे निकाल ५० ते ६० टक्केच्या आसपास लागत होते.

कळमनुरीचे प्रकल्पाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर डॉ. विशाल राठोड यांनी शाळांमधुन गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला. यामध्ये औंढा तालुक्यातील पिंपळदरी, कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी, बोथी, जामगव्हाण या शाळांमध्ये ‘मॅथ माऊंटेन’ हा उपक्रम सुरू करुन विद्यार्थ्यामध्ये गणिताबाबत गोडी निर्माण केली तर इंग्रजीमध्येही वर्गांमधून स्पर्धा घेतल्या. त्यामुळे गणित व इंग्रजी या विषयाची विद्यार्थ्यांच्या मनातील भिती आपोआपच दुर झाली. या शिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्यात आले. तसेच प्रकल्पातील शाळांतर्गत दहावीच्या सराव परिक्षा घेतल्या त्यामुळे नेमका विद्यार्थी कोणत्या विषयात मागे आहे याचा अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची वेळे तसेच जादा वर्गा व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले. यासाठी शाळांमधील सर्व शिक्षकांनीही मोठे प्रयत्न केले.

दरम्यान, यावर्षी दहावीचा निकाल हाती पडताच आदिवासी भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकू शकतात हे स्पष्ट झाले. प्रकल्पांतर्गत चारही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या शाळांमधून विद्यार्थीनींनीच बाजी मारली आहे. राज्यात कळमनुरी प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळवून प्रकल्पाचा हिंगोली पॅटर्न निर्माण केला आहे.

८८ विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य

या चार शाळांमधून २४५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी ८८ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले असून १०७ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये ९४ टक्के गुण मिळविणारे विदयार्थी देखील आहेत.

शिक्षक अन विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे यश ः डॉ. विशाल राठोड, प्रकल्पाधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालय कळमनुरी

प्रकल्पांतर्गत शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी वर्षभर शैक्षणिक उपक्रम राबविले तसेच केवळ अभ्यासातच नव्हे तर त्यांना कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रम व मैदानी खेळाच्या स्पर्धा घेतल्या. या खेळांमधे प्रकल्पातील खेळाडूंनी राज्याचे मैदान गाजविले. तर आता निकालानंतर शैक्षणिक क्षेत्रातही मैदान गाजवले असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षक अन विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे हे यश आहे.