आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कोविड योध्दा गुरुजींच्या मृत्यूनंतरही हालअपेष्टा कायम, पाच तास रुग्णवाहिकाच आली नाही, नातेवाईकांनीच पीपीई किट घालून केलेे अंत्यसंस्कार

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रहिवासी असलेले डिगांबर लक्ष्मण शेळके (५२) हे नर्सी नामदेव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात कोविड योध्दा डिगांबर शेळके या गुरुजीचा मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकाच नाही तर सोबत कर्मचारीही दिले नाही, १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही अखेर संतप्त नातेवाईकांनीच स्वतः पीपीई किट घालून खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. शुक्रवारी ता. २ पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रहिवासी असलेले डिगांबर लक्ष्मण शेळके (५२) हे नर्सी नामदेव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. त्यांच्याकडे शालेय पोषण आहार वाटपासह प्रवेश निर्गम उतारा देणे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देणे आदी कामे देण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते शाळेत येत होते. या शिवाय गावात ही ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत होेते.

मात्र मागील पाच दिवसांपुर्वी पासून त्यांना सर्दी, ताप, खोकला सुरु झाला. त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल आल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरु असतांना गुरुवारी ता. १ रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी केली. मात्र रुग्णालयातून त्यांना कोणीही दाद दिली नाही. रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नसल्याचे सांगत १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर या क्रमांकावर वारंवार संपर्क केल्यानंतरही संपर्क झालाच नाही. पहाटे अडीच वाजे पर्यंत एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावली. त्या रुग्णवाहिकेच्या चालकास पीपीई किट देण्यात आला तर मयत शेळके यांच्या नातेवाईकांनी पीपीई किट घालून मृतदेह सोबत घेतला. आज पहाटे तीन वाजता त्यांच्यावर रिसाला पॉवर हाऊस जवळील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करून देखील रुग्णालयाला पाझर फुटला नाही तर १०८ क्रमांकावर संपर्क झाला नाही. या प्रकारामुळे नातेवाईकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.

पालिका प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्‍नचिन्ह

राज्यात इतर जिल्हयात कोविड रुग्णाच्या मृत्यू नंतर पालिकेच्या पथकाकडून पीपीई किट घालून योग्य काळजी घेत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र हिंगोली पालिकेला हे का जमत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या कामकाजावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत तक्रार करणार ः डॉ. सतीष पाचपुते जिल्हा परिषद सदस्य

नर्सी नामदेव येथील शिक्षक डिगांबर शेळके यांचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका दिलीच नाही शिवाय १०८ क्रमांकावरही संपर्क झाला नाही. त्यामुळे गुरुवारी ता. १ रात्री साडेदहा ते शुक्रवारी ता. २ पहाटे अडीच वाजेपर्यंत रुग्णालयाच्या परिसरात ताटकळत बसावे लागले. या प्रकरणी आपण पालकमंत्री वर्षा गायकवाड, खासदार ॲड. राजीव सातव यांच्याकडे तक्रार करणार आहे.