आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरासह जिल्हाभरात सोमवार 1 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. तर बाहेरगावाहून हिंगोली बसस्थानकावर येणाऱ्या सर्वच प्रवाशांच्या अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. या चाचणीत आज दुपारपर्यंत 4 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत.
हिंगोली जिल्हयात मागील चार दिवसांत कोविड रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. सध्याच्या स्थितीत २३२ रुग्णांवर उपचार केला जात आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर ता. १ मार्च ते ता. ७ मार्च या कालावधी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.
संचारबंदीमुळे हिंगोलीतील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच कार्यालयास जाण्याची परवानगी देण्यात आली. तर हिंगोली आगारातून बसफेऱ्या सोडण्यात आल्या नाही. मात्र इतर आगाराच्या हिंगोली बसस्थानकावर आलेल्या बसमधून उतरलेल्या प्रवाशांची बसस्थानकावरच रॅपीड ॲन्टीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दुपार पर्यंत ४ प्रवाशी कोविड पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या पथकाने शहरात सार्वजनीक ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचनाही दिल्या आहेत.
हिंगोली शहर व जिल्हयात कोविडच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरीकांच्या आरोग्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरीकांनी संचाबंदीच्या काळात बाहेर पडू नये. तसेच ठिकठिकाणी अँन्टीजन कॅम्प लावण्यात आले असून कोविडची लक्षणे असणाऱ्या संशयीत रुग्णांनी या ठिकाणी चाचणी करून घ्यावी. त्यामुळे कोविडचा प्रसार होण्यास प्रतिबंध करणे शक्य होणार आहे असे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.