आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वसमत मध्ये गोदामावर टाकलेल्या छाप्यात 43 लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल एक जण ताब्यात

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत शहरातील कबुतरखाना भागातील एका गोदामावर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एक टाटा एस ॲटो सह 43 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर शुक्रवारी ता. 16 पहाटे गुन्हा दाखल झाला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. वसमत शहर पोलिसांची आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. वसमत शहरात मागील काही दिवसांपासून गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असून बाहेर राज्यातून आलेला गुटखा वसमत शहर व तालुक्यातील काही भागात साठवून ठेऊन त्याची बाजारपेठेत चोरीछुपे विक्री केली जात आहे. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांपुर्वीच एका घरावर छापा टाकून गुटख्याची पोते जप्त केली होती.

त्यानंतर वसमत शहरातील कबुतरखाना भागातील एका गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याची पोते साठवणुक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनापोड, उपनिरीक्षक जी. एस. बर्गे, जमादार कृष्णा चव्हाण, प्रेमदास चव्हाण, शंकर हेंद्रे, वडगावे, ठोंबरे यांच्या पथकाने गुरुवारी ता. 15 रात्री छापा टाकला. यामध्ये गोदामात गुटख्याची पोती आढळून आली. या शिवाय गुटखा वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेला टाटा एस ॲटो देखील आढळून आला.

दरम्यान, पोलिसांनी या पोत्यांची पाहणी केली असता त्यात 13.44 लाख रुपये किंमतीचे वजीर गुटख्याचे 28 नायलॉनचे पोते, 18.90 लाख लाख रुपये किंमतीचे राजनिवास गुटख्याचे 54 नायलॉनचे पोते, 8 लाख रुपये किंमतीचे गोवा गुटख्याचे 10 नायलॉनचे पोते आढळून आले. पोलिसांनी सदरील गुटख्याची पोते व 2.70 लाख रुपये किंमतीचा टाटा एस ॲटो (क्र.एमएच-25-पी-2799) जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या तक्रारीवरून मुजाहितखाँ नसीबखाँ पठाण (रा. कबुतरखाना वसमत), सय्यद जाफर सय्यद बाबु (रा. सोमवारपेठ, वसमत) यांच्या विरुध्द आज गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सय्यद जाफर यास ताब्यात घेतल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...