आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शहरालगत अंधारवाडी क्वारंटाईन सेंटरवर पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी माजी तंटामुक्ती अध्यक्षावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याची छाती दुखत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
हिंगोली शहरालगत अंधारवाडी येथील आदिवासी वसतीगृहामध्ये क्वारंटाईन सेंटर करण्यात आले आहे. शहरात बाहेर जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, पुणे, नाशीक या भागातून आलेल्या नागरीकांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घेऊन त्याचा अहवाल आल्यानंतर चौदा दिवसानंतर सुट्टी दिली जात आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचारी देखील बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, अंधारवाडी येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष अर्जून आनंदराव भोस हा रविवारी रात्री सात वाजता तेेथे आला. त्याने क्वारंटाईन सेंटरसमोरच ठाण मांडले. त्यानंतर तोंडाला मास्क न लावता क्वारंटाईन सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी लखन ठाकूर यांनी त्यास बाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्याने ठाकूर यांनाच शिवीगाळ केली. या प्रकरणी ठाकूर यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आज दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू बरडे, उपनिरीक्षक राहूल तायडे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याला वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यास रुग्णालयातच उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. दरम्यान, अर्जुन भोस हा स्वस्त धान्य दुकानदार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.