आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली येथील सुराणा नगरातील दरोडा प्रकरणात हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी ता. 11 पहाटे जालना येथे धरपकड मोहीम हाती घेऊन सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. अन्य चौघांचा शोध सुरु असून सदर गुन्हा उघडकीस येणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली शहरालगत सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरावर 12 ते 13 जणांच्या दरोडेखोरांना रविवारी ता. 7 पहाटे दरोडा टाकला. यामध्ये घरातील महिला व पुरुषांच्या गळ्यावर तलवार ठेऊन दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 2.25 लाख रुपयांचा ऐवज पळवला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसतांना दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.
दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी तपास पथके स्थापन केली. पोलिस अधिक्षक कलासागर यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला संयुक्तपणे तपास करून सायबरसेलची मदत घेण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने मागील चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात संशयीतांची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणात जालना येथील काही जण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यावरून हे पथक जालना येथे पोहोचले.दरम्यान, आज पहाटे अडीच वाजल्यापासून पोलिसांच्या पथकाने जालना पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे टाकून सात संशयीतांना ताब्यात घेतले. तर अन्य चौघांचा अद्यापही शोध सुरु आहे. तर ताब्यात घेतलेल्या संशयीतांच्या घरझडतीचे काम सुरु आहे. या सर्वांना हिंगोली येथे आणल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या चौकशीतून गुुन्ह्याला वाचा फुटणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरोडेखोरांची हायटेक माहिती
हिंगोलीत दरोडा टाकल्यानंतर फरार झालेल्या या संशयीत दरोडेखाेरांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची तपासणी केली. त्यांच्या व्हॉटस्अपवर हिंगोलीच्या दरोड्याच्या बातम्या दिसून आल्या. त्यांनी या बातम्या एकमेकांना शेअर केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.