आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोलीत उपनिरीक्षकाची आरडीसी विरुध्द तक्रार तर राजपत्रीत महासंघाची उपनिरीक्षका विरुध्द कारवाईची मागणी, पोलिस अधिकारी अन्‌ महसुल विभागात संघर्ष पेटला

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षक अन महसुल विभागात संघर्ष पेटला असून एका उपनिरीक्षकाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विरुध्द तक्रार दिल्यानंतर राजपत्रीत अधिकारी महासंघाने रविवारी (ता. १४) प्रशासनाला निवेदन देऊन उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता ऐन कोरोनाच्या काळातील योध्दे मानले जाणाऱ्या प्रशासनामध्येच संघर्ष पेटल्याने वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौकामध्ये शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांचे पथक बंदोबस्तावर ठेवण्यात आले होते. शनिवारी ता. १३ सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास उपनिरीक्षक अनमोड यांनी खाजगी वाहनांवर अंबर दिवा असल्याचे पाहून वाहन अडविले. मात्र वाहनामध्ये असलेल्या अधिकाऱ्याने त्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी असल्याचा परिचय दिला. मात्र उपनिरीक्षक अनमोड यांनी खाजगी वाहनावर अंबर दिवा लावणे नियमाचा भंग करण्यारे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर वाहन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणात त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये संबंधीत अधिकाऱ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

दरम्यान, आज राजपत्रीत अधिकारी महासंघाचे पदाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पांडूरंग माचेवाड, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील, शैलेश फडसे,  समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. छाया कुलाल, भाऊराव चव्हाण, प्राचार्य गणेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांचे वाहन थांबवून विनाकारण वाद घालणे चुकीचे आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसोबत उपनिरीक्षकाने अशोभनीय वर्तण केले आहे. तसेच सुर्यवंशी यांच्या विरुध्द खोटी तक्रार दिली आहे. या प्रकरणात उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांच्यावर  निलंबनाची कारवाई करावी अन्यथा महासंघाकडून सोमवारपासून ता. १५ बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या शिवाय महसुल विभागाकडूनही निवेदन देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात पोलिस व महसुल विभागात संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात आता दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेतात याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

उपाधिक्षकांच्या अहवालानंतर निर्णय घेणार ः योगेशकुमार, पोलिस अधिक्षक

या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांना दिले आहेत. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्या अहवालानंतरच  पुढील  बाबत निर्णय घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...