आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यातील दुर्गधामणी शिवारात गायरान जमीनीवर साठा करून ठेवलेली ४० लाख रुपये किंमतीची ४०० ब्रास रेती तहसील कार्यालयाच्या पथकाने जप्त केली असून सदर रेती तहसील कार्यालयाच्या मैदानावर आणण्याचे काम मंगळवार ता. १५ पहाटे पासून सुरु झाले आहे. हिंगोली जिल्हयातील महसुल विभागाची हि सर्वात मोठी कारवाई आहे.
हिंगोली तालुक्यातून कयाधू नदी वाहते. या नदीच्या पात्रातून रेती उपसा करून त्याची विक्री केली जाते. मात्र मागील काही दिवसांत रेती घाटांचे लिलाव झालेच नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त रेती वाहतुक करता यासाठी रेतीसाठा देखील केला जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील दुर्गधामणी शिवारात नदीच्या पात्राच्या जवळच गायरान जमीनीवर मोठ्या प्रमाणावर रेतीसाठा असल्याची माहिती तहसीलच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पांडूरंग माचेवाड, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, मंडळ अधिकारी मनोहर खंदारे, खंडेराव पोटे, गजानन परिसकर, मद्दीलवार, तलाठी चौधरी, साबळे, इंगळे, हर्षवर्धन गवई, अशोक केंद्रेकर, यांच्या पथकाने सोमवारी ता. १४ रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास दुर्गधामणी परिसरात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी गायरान जमीनीवर तब्बल ४०० ब्रास रेतीसाठा आढळून आला. तहसीलदार माचेवाड यांनी तातडीने रेतीसाठा जप्त करून पाच टिप्परद्वारे रेतीसाठा तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून टाकण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार रेतीसाठा उचलण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून पाच टिप्पर द्वारे रेती तहसील कार्यालयाच्या परिसरातील मैदानावर आणली जात आहे. या रेतीची किंमत ४० लाख रुपये असल्याचे तहसीलदार माचेवाड यांनी सांगितले.
बेकायदेशीर रेती वाहतुकीला आळा घालणार : पांडूरंग माचेवाड, तहसीलदार हिंगोली
हिंगोली तालुक्यातील रेतीघाटावरून रात्रीच्या वेळी रेती उपसा करून त्याची वाहतुक करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महसुल विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथके चोविस तास कार्यरत राहणार असून रेती वाहतुकीसोबतच रेतीचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.