आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:हिंगोली पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला वाहतुक पोलिसांचे पाठबळ, वाहनातून कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेने सुरु केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला हिंगोली शहर वाहतुक शाखेचे पाठबळ मिळाले असून आता शहरात वाहनातून कचरा बाहेर फेकणे, चिप्सचे प्लास्टीक फेकणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतुक शाखेने गुरुवारी ता. १७ स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होत असल्याची घोषणा केली आहे.

हिंगोली शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. त्यासाठी पालिकेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव देखील घेतला आहे. या शिवाय मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, अभियंता सनोबर तसनीम, पालिका कर्मचारी बाळू बांगर, मुंजा बांगर, शिवाजी घुगे, विनय साहू यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात स्वच्छता राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यास सुरवात केली आहे.

या शिवाय डॉ. कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील सार्वजनीक भिंतींवर छायाचित्राद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जलकुंभावर देखील रंगरंगोटी करून पाणी बचतीसोबतच स्वच्छतेचे संदेश दिले आहे.

दरम्यान, पालिकेच्या या अभियानाला वाहतुक शाखेचे पाठबळ मिळाले आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, गजानन सांगळे, गजानन राठोड, शिवाजी पारिसकर, शेषराव राठोड, किरण चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग घेत असल्याचे जाहिर केले आहे.

यामध्ये शहरातील मुख्य मार्गावरून धावणाऱ्या वाहनांसोबतच शहरात फिरणाऱ्या वाहनांमधून कचरा बाहेर टाकणे, केळीचे सालपट बाहेर टाकणे, चिप्स, कुरकुरे खाऊन त्याची रिकामी पाकिटे बाहेर टाकणे, वाहनातून रस्त्यावर थुंकणे असे प्रकार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हिंगोली शहरातून जाणाऱ्या वाहनांवर देखील हि कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या पाठबळामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियान अधिक गतीमान होणार आहे.

हिंगोली शहरात चार पथके तैनात : ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा

हिंगोली पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला पोलिस विभागाकडून हातभार लावला जाणार आहे. शहरात पोलिस विभागाची चार पथके तैनात करण्यात आली असून वाहनांतून कचरा, प्लास्टीक पिशव्या, चहा पिऊन रिकामे डिस्पोजल कप फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी तसेच प्रवाशांनी पालिकेला व पोलिस विभागाला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...