आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोलीत आदिवासी आश्रमशाळांमधूनही आता ऑनलाईन शाळा प्रवेश होणार, पाच शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एकीकडे आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी असतांना दुसरीकडे हिंगोली जिल्हयात मात्र प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी प्रसिध्द करावी लागते. यावर्षी कोरोनामुळे पालकांच्या सोयीसाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे शाळेतील गर्दी रोखली जाणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाचा यावर्षी पहिला प्रयोग आहे

हिंगोली जिल्हयात आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत पाच शासकिय आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी, बोथी, जामगव्हाण तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व शिरडशहापूर येथील आश्रमशाळांचा समावेश आहे. जामगव्हाण येथे इयत्ता १२ वी पर्यंत वर्ग असून शिरडशहापूर येथे ८ वी पर्यंत तर इतर तीन ठिकाणी १० वी पर्यंतचे वर्ग आहेत.

या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे मागील दोन वर्षात आश्रमशाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विभागाच्या गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे. या शिवाय शाळांमध्ये भौतिक सुविधा तसेच अभ्यासासोबत खेळाला प्राधान्य दिले जात असल्याने या शाळांमधून प्रवेशासाठी गर्दी वाढू लागली आहे. मागील वर्षी पाचही शाळांमधून प्रवेश संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे आदिवासी विभागाच्या परवानगीने प्रत्येक वर्गाची एक अतिरिक्त तुकडी वाढवावी लागली होती. त्यानंतरही प्रतिक्षा यादीमध्ये प्रत्येक वर्गासाठी २० ते २५ विद्यार्थी होते.

दरम्यान, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश सहजपणे घेता यावेत यासाठी प्रकल्पाधिकारी डॉ. राठोड यांनी ऑनलाईन प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून त्यावर ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे पालकांची तसेच विद्यार्थ्यांची शाळांमधून होणारी गर्दी रोखण्यास मदत होणार आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे सहजपणे प्रवेश प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे एकाच वेळी माहिती संकलन

या प्रक्रियेमुळे एकाच वेळी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीचे संकलन होणार आहे. यामध्ये नांव, गाव, पत्ता यासोबतच शिष्यवृत्तीसाठी बँक खाते क्रमांक बँकेचा कोड, आधारकार्ड क्रमांक हि महत्वाची माहिती प्रवेशाच्या वेळीच मिळणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांची माहिती देण्यासाठी धावपळ होणार नाही.

पालकांच्या सोयीसाठी घेतला निर्णय ः डॉ. विशाल राठोड, प्रकल्पाधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालय कळमनुरी

आदिवासी आश्रमशाळांमधून प्रवेशासाठी गर्दी होत आहे. यावर्षी कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळले जावे तसेच प्रवेशासाठी पालकांची धावपळ रोखण्यासाठी ऑनलाईन प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांची गैरसोय दूर होणार आहे. तर यावर्षी शिरडशहापूर येथील शाळेत इयत्ता नववीचा वर्ग सुरु केला जाणार आहे. प्रवेशासाठी पालकांनी त्यांच्या पाल्याचे अर्ज भरावेत.

0