आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मराठवाड्यासह विदर्भात दुचाकी चोरणाऱ्या मामा भाच्याचा धुमाकुळ, 29 वाहने जप्त, हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या पथकाने मागील तीन दिवसांपासून माहिती घेत गडदगव्हाण येथील एकास ताब्यात घेतले

मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हयांमधून दुचाकी चोरून धुमाकुळ घालणाऱ्या मामा-भाच्याचे कारनामे उघडकीस आले असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 29 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंगोली जिल्हयातून मागील काही दिवसांत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस अधिक्षक कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, ज्ञानेश्‍वर सावळे, शंकर जाधव, किशोर सावंत, सुनील अंभोरे, भगवान आडे, विलास सोनवणे यांची दोन पथके स्थापन केली होती.

या पथकाने मागील तीन दिवसांपासून माहिती घेत गडदगव्हाण येथील एकास ताब्यात घेतले. राजू उर्फ सचिन खिल्लारे असे त्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजू व त्याच्या मामाने मराठवाडा व विदर्भातील काही जिल्हयांमधून 29 वाहने चोरी केली आहेत. सदर वाहने बनावट कागदपत्रे तयार करून त्याची कमी किंमतीत विक्री केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी राजू खिल्लारे याची चौकशी केली असता त्याने सदर वाहने मामाने चोरून आणून दिल्याचे स्पष्ट केले. मात्र वाहने कुठून चोरली याची माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

त्यावरून आता पोलिसांनी त्याच्या मामाचा शोध सुरु केला असून त्यानंतरच किती जिल्हयातून ही वाहने चोरली याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर प्राथमिक चौकशीमध्ये परभणी, नांदेड, वाशीम, हिंगोली, रिसोड या भागातून वाहने चोरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...