आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोली जिल्हा परिषदेच्या नियंत्रण कक्षाचा 563 ग्रामपंचायतीवर राहणार वॉच, जिल्ह्यात कोरोनाबाबत माहिती तातडीने मिळणार

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची माहिती तसेच गावकऱ्यांच्या इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाद्वारे जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतीवर वॉच राहणार आहे. गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांची तातडीने सोडवणूक केली जाणार आहे.

हिंगोली जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही वाढत आहे. मात्र ग्रामीण भागातील गावकऱ्यांना योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांमधून असुरक्षीततचे वातावरण निर्माण झाले होते. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनाही योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र होते. त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा परिषदेमधे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय इतर सदस्यांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, वैद्यकिय अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, सहाय्यक प्रशासन अधिकारी यु. एल. हातमोडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राधेशाम परांडकर, सुनील गुठ्ठे, विस्तार अधिकारी अनिल केदार, आरोग्य पर्यवेक्षक के. वाय. इशी यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूबाबतचे सर्व आदेश, माहिती या ठिकाणी एकत्रीत केली जाणार आहे. या शिवाय विविध यंत्रणेसोबत समन्वय साधाला जाणार आहे. या शिवाय गावकरी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या कोरोनाबाबत समस्या असल्यास त्यांची सोडवणुक करण्याचे प्रयत्न या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे. या शिवाय जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतीवर लक्ष ठेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या समस्या, कंटोनमेंट झोनची अडचण मांडल्यास तातडीने पंचायत समिती मार्फत किंवा ग्रामसेवका मार्फत सोडवली जाणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील गावकऱ्यांना नियंत्रण कक्षाचा आधार मिळणार आहे.

अत्यावश्‍यक माहितीसाठी संपर्क साधावा ः राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी

ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या सोयीसाठी या नियंत्रण कक्षातील भ्रमणध्वनी उपलब्ध करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी अत्यावश्‍यक माहितीसाठी ९८२२३३५२७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गावकऱ्यांनी घरीच थांबावे अन् सुरक्षीत रहावे.