आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोलीचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय सील, दहा कर्मचारी विलगीकरण कक्षात दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील एका कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाने शुक्रवारी (ता. ३) सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय सील केले आहे. त्यानंतर कार्यालयातील दहा कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरालगत  असलेल्या अंधारवाडी येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.

हिंगोली येथे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये सुमारे बारा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये  काही कर्मचारी परभणी येथून ये -जा करतात. चार ते पाच दिवसापूर्वीच परभणी येथून ये-जा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे वडिल परभणी येथे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे परभणीच्या आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल परभणीच्या शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. यामध्ये हिंगोली येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती हिंगोलीच्या आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाळ कदम,  वैद्यकीय अधिकारी डॉ. जफर यांच्यासहआरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठून याबाबतची माहिती कार्यालयाला दिली. त्यानंतर कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच कार्यालयातील दहा कर्मचारी अंधारवाडी येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅब  नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांची विलगीकरण कक्षातून सुट्टी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

यासंदर्भात सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी आर. एन. गिऱ्हे  यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी सदर कर्मचारी मागील  काही दिवसापासून कार्यालयात आले नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर सर्व कर्मचारी विलगीकरण कक्षात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

0