आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये परगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी वाहतूकदारांनी (ट्रॅव्हल्स) प्रवासी भाड्यात दुप्पट वाढ केली आहे. सुट्यांमुळे रेल्वे स्टेशन, एसटी बस स्टँड आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या स्टॅापवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
रेल्वे स्टेशनच्या दररोज प्रवासी संख्येत मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल, मे महिन्यांत ३ हजारांनी, तर एसटीच्या प्रवासी संख्येत मार्च महिन्याच्या तुलनेत ६ हजारांनी वाढ झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवासी फारसे वाढले नसले, तरी भाड्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. ५०० रुपये तिकीट असणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या एसी बसचे भाडे थेट १ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढवले आहे.
शाळा, कॉलेजांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक कुटुंबीयांसह पुणे, मुंबई, नाशिक येथे फिरण्यासाठी जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी गावी परत जात आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी बसच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
रेल्वेचे १० टक्के प्रवासी वाढले
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मार्च महिन्यात रेल्वे स्टेशनवरून दररोज सरासरी २५ हजार प्रवासी प्रवास करत होते. एप्रिल आणि मे महिन्यांत सुट्या असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात दररोज ३ हजार प्रवासी वाढले असून, आता रोज सरासरी २८ हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत आहे. उन्हामुळे वातानुकूलित (एसी) डब्यांची मागणी वाढली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
एसटीची उलाढाल ६ लाखांनी वाढली
एसटी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बस स्टाॅप फुल झाले आहे. बसस्थानकातून मार्च महिन्यात दररोज सरासरी १३ हजार प्रवासी प्रवास करत होतेे. यात एप्रिल आणि मे महिन्यात वाढ झाली असून आता रोज सरासरी १९ हजार प्रवासी बसमधून प्रवास करत आहेत. प्रवाशांच्या संख्येत तब्बल ६ हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीची दैनंदिन उलाढालही सरासरी ६ लाख रुपयांची वाढली आहे. मार्च महिन्यात रोज सरासरी १२ लाख रुपयांची उलाढाल होत होती. ती आता १८ लाखांपर्यंत गेली आहे, अशी माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली.
खासगी ट्रॅव्हल्सची प्रवासी संख्या ‘जैसे थे’
सुट्यांमुळे सध्या सीझन आहे. खासगी ट्रॅव्हल्सची संख्या ‘जैसे थे’च असून, प्रवासी संख्यादेखील पूर्वीएवढीच आहे. मात्र, सीझन असल्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे.
- पुष्कर लुले, बस ओनर्स अँड टूर्स वेल्फेअर असोसिएशन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.