आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद कोरोना काळात मुंबईतील जे.जे हॉस्पीटल येथील चार हजार लोकांना जेवण पुरवण्याचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून हॉटेल नैवेद्यच्या मालाकाला 41 लाख 5 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी नाशिक येथून तब्बल पाच महिन्यांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. चरडे यांनी दिले.
खोटी कागदपत्रे दाखवली
संदीप बाबूलाल वाघ आणि स्वप्नील भरत नांद्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणात हॉटेल नैवेद्यचे भक्तबंधू रामचंद्र पाढी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, या दोन आरोपींनी साथीदार महिलेसह पुणे येथील महाराष्ट्र सिव्हील फोर्स, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात काम करत असल्याचे सांगत शासनात नोकरीचे ओळखपत्र, शिक्के आणि कागदपत्रे दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच आरोपी संदीप वाघ याने आपली स्वत:ची आर. बी. केटरर्स व फूड सप्लायर्स या नावाने बामणवाडा अंधेरी वेस्ट येथे फूड सप्लायची फर्म असल्याचे सांगितले.
असे दाखवले आमिष
फूड फर्मव्दारे संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी कार्यालय आणि हॉस्पिटलच्या कॅन्टीनला फूड सप्लायचे टेंडर घेवून त्यांना जेवण पुरविण्याचे काम करत असल्याची थाप फिर्यादीला मारली. फिर्यादीचा विश्वास बसल्याचे पाहून आरोपींनी कोरोना काळात औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, जालना, परभणी, सांगली, साताऱ्यात अशा विविध ठिकाणी तसेच मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधील 4 हजार लोकांना जेवण पुरविण्याचे काम देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी 70 ते 80 लाख रुपये डिपॉजीट म्हणून द्यावे लागतील, अशी थाप मारली. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने 41 लाख पाच हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.