आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यल्प दरात घर:जैन समाजातील 68 गरजवंतांना अत्यल्प दरात घर, कर्ज फेडण्यासाठी रोजगारही

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) गरीब जैन बांधवांसाठी ‘जितो आवास योजना’ सुरू केली आहे. याअंतर्गत शहरातील ६८ जणांना घरे दिली जातील. पहिल्या टप्प्यात जुलैमध्ये २५ जणांना घराची चावी मिळेल. घरासाठी बँक कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जितोच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष रवी खिवंसरा व मुख्य सचिव आशिष पोकरणा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

खिवंसरा म्हणाले, विविध शहरांत येत्या दोन वर्षांत ५ हजार घरे दिली जातील. नक्षत्रवाडीत १७ ते २२ लाखांचे ६८ फ्लॅट (१ बीएचके - ५१ फ्लॅट, २ बीएचके-१४ फ्लॅट, ३ बीएचके-३ फ्लॅट) बांधण्यात येत आहेत. घरकुल नसलेल्या जिल्ह्यातील जैन बांधवांची माहिती गोळा केली जात आहे.

सोशल मीडियाद्वारे मागवले अर्ज : आवास योजनेची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत १२५ जणांचे अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करून पहिल्या टप्प्यात २६ जणांना घर दिले जाईल. जुलैमध्ये जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष गणपतराज चौधरी, अध्यक्ष सुरेश मुथा यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात येईल. पत्रकार परिषदेस अनिलकुमार संचेती, पंकज पांडे, संजय कांकरिया, अजित जैन व मनोज जैन यांची उपस्थिती होती.

उत्पन्न ३ ते ६ लाख असावे जितो आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती २१ ते ७५ या वयोगटातील आणि जैन समाजाची, वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाखांपर्यंतचे असावे. तिच्या नावे घर नसावे. विधवा, अपंग यासह अत्यल्प उत्पन्न असलेल्यांना विशेष मदत केली जाईल. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र व्यक्तींना बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संघटना मदत करणार आहे.

कच्चा माल पुरवणार घर घेतल्यानंतर कर्ज फेडण्यास अडचणी येत असल्यास अशा कुटुंबांना गृहोद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. महिलांना पापड, लोणचे, खारका, मसाले तयार करण्यासाठी कच्चा माल, लागणाऱ्या मशिनरी जितोकडून दिल्या जातील. त्यांनी तयार केलेला माल खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना गृहकर्ज फेडण्यात अडचण येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...