आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनीत पाडापाडी:उद्धस्त होणारा संसार माझ्याच डोळ्याने पाहू कसा? ; प्रशासनाने बळजबरीने साहित्य घराबाहेर काढल्यामुळे हताश झालेल्या रहिवाशांच्या भावना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनीत सरकारी यंत्रणा एकेक घर उद‌्ध्वस्त करत होती त्यावेळी तेथे उपस्थित सर्वच रहिवाशी अक्षरश: टाहो फोडत होते. अनेक वर्षे ज्या घरांच्या छत्रछायेत राहिलो, लहानांचे मोठे झालो तीच वास्तू आज आपल्याच नजरेसमोर जमीनदोस्त होताना त्यांना अनंत वेदना होत होत्या. आजवरचे सख्खे शेजारी एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

अनेकांच्या घरातील साहित्य अजूनही कॉलनीच्या परिसरात अस्ताव्यस्त पसरलेले होते. अनेक रहिवाशांनी अजूनही पर्यायी घरांची सोय केली नव्हती. आता नवा संसार कुठे उभारावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. भावनांचा कल्लोळ होत असलेले हे चित्र पाहून उपस्थित सरकारी कर्मचारी, पाडापाडी करणारे मजूरही भावनावश झाले होते.

रहिवाशांनी पाळीव पाखरांचे पिंजरे घेऊन घर सोडले. दुसरीकडे एक चिमुकली गणेशाची प्रार्थना करत होती. लेबर कॉलनीत किमान १५ आंब्यांची झाडे आहेत. पाडापाडी सुरू असताना लहान मुले या झाडांवरील कैऱ्या काठीने पाडत होती. तर सरकारी यंत्रणेने या कारवाईत अनेक झाडे तोडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला.

पाडापाडी सुरू असताना प्रशासनाने तिथे सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणारे अनेक लोक वाहन रस्त्यात लावून ही कारवाई पाहण्यात मग्न झाले होते. दुपारपर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त केला, नंतर मात्र थोडी शिथिलता देण्यात आली. त्याचा फायदा घेऊन अनेक भंगार विक्रेते कॉलनीत शिरले व लोखंडाची पळवापळवी केली.

बातम्या आणखी आहेत...