आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आणि राज्यभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आता सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. मुंबई-ठाण्यापाठोपाठ औरंगाबाद शहर आणि पुणे जिल्ह्यात शाळा बंदच राहणार आहेत. औरंगाबाद शहरात थेट ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार असून पुणे येथे १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावी हे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर चाेहाेबाजूने टीकेची झाेड उठली आहे. कोराेनाची दुसरी लाट येण्याची भीती असून दिवाळीनंतर वाढते रुग्ण बघता या चिंतेत भरही पडली आहे. अशा परिस्थितीत घाईघाईत शाळा सुरू करू नये असे मत पालक, शिक्षक, डाॅक्टरांपासून तर विविध क्षेत्रांतून उमटत आहे. राज्यभरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विविध स्तरांवरील व्यासपीठावरून शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच शाळा संस्थाचालकांकडून एकसुरात शाळा सुरू करू नये असा रेटा लावला जात आहे.
धुळे : दोन दिवसांत ५ शिक्षक पॉझिटिव्ह
जिल्ह्यात सात हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आतापर्यंत ४ हजार ०६४ शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असून त्यात ५ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली. शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
नागपूर : ४२ शिक्षक पॉझिटिव्ह
जिल्ह्यात ४२ शिक्षक कोरोना बाधित निघाल्याने शाळा सुरू करण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. जि.प.चे ४१ शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली. तर मनपाच्या २५० शिक्षकांची तपासणी केली असता १ शिक्षक कोरोनाबाधित निघाला आहे.
जळगाव : दोन टक्के पॉझिटिव्हिटी रेट
जळगाव | जिल्ह्यात आतापर्यंत २५०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५०० जणांच्या तपासण्या झाल्या आहेत. त्यात पॉझिटिव्हिटी रेट साधारणत: दोन टक्के असल्याचे शासकीय रुग्णालय प्रशासनाने सांगितले. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही.
सोलापूर : १७८ शिक्षक बाधित
जिल्ह्यातील इंग्रजी, गणित व विज्ञान शिक्षकांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत असून शनिवार (दि.२१) पर्यंत १४,२०५ शिक्षकांची तपासणी झाली असून त्यापैकी तब्बल १७८ शिक्षक बाधित आहेत. मात्र सोलापूर शहरात अद्याप एकही शिक्षक बाधित नाही. अद्याप ८६९ शिक्षकांचे अहवाल प्रलंबीत आहेत
औरंगाबाद शहरात बंद, ग्रामीण भागात मात्र सुरू :
शहरातील नववी ते बारावीच्या शाळा आता ३ जानेवारीपर्यंत बंदच राहतील, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी दिली. परंतु ग्रामीण भागातील ८२४ शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे
शिक्षकांच्या जिवाची सरकार हमी घेणार का?
काेराेनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत शिक्षकांच्या जीविताची सरकार हमी घेणार आहे का? शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करायला हवी. -प्रा. सुनील मगरे, संस्थापक सचिव, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन.
परवानगीची वाट न पाहता २३ पासून क्लास सुरू
कोचिंग क्लास असोसिएशनच्या वतीने ८ संघटना मिळून शाळेसाठी ठरवलेल्या नियमावलीनुसार २३ तारखेपासून महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस सुरू करणार आहोत. - प्रा. पांडुरंग मांडकीकर, अध्यक्ष, कोचिंग क्लास असोसिएशन, महाराष्ट्र
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.