आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्याचा हनी ट्रॅप:इंजिनिअर मैत्रिणीच्या जाळ्यात अडकवून पोलिसाला लुटले; चाकू लावून धमकावले, ‘मॅडम के चार लाख दे, नहीं तो खतम कर दूंगा’

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मैत्रीणीसह दोन साथीदार गजाआड; टिप्या मात्र फरारच

शिवाजीनगर भाजीमंडईत १७ सप्टेंबर रोजी भरदुपारी कुख्यात गुन्हेगार शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिप्याने एका महिलेसह पोलिसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी त्याने कारागृह पोलिसाला अपहरण करून गळ्याला चाकू लावत लुटले. साक्षी (नाव बदलले आहे) नावाच्या अभियंता मैत्रिणीच्या नावावर प्लॉट करून घेतला. विशेष म्हणजे याच मैत्रिणीने त्या पोलिसाकडून आदल्या दिवशी दोन लाख रुपये घेतले होते. तरीही तो तक्रार देत नव्हता. मात्र, गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासात हा प्रकार समोर आला. त्यानंतर एकतानगर, जटवाडा रोड येथील २५ वर्षीय साक्षी तसेच टिप्याचे साथीदार अर्जुन राजू पवार-पाटील, दीपक दसपुते-पाटील (रा. विजयनगर) यांना अटक करण्यात आली.

पोलिस दलासमोर मोठे आव्हान ठरलेल्या टिप्या व त्याची नवी मैत्रीण साक्षीविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी : सध्या लातूर कारागृहात कामावर असलेले ३३ वर्षांचे रक्षक सतीश तुकाराम उबरहंडे दोन वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काम करत असताना त्यांची टिप्याशी ओळख झाली. जटवाडा रोडवर राहणाऱ्या गणेश गवळी या मित्राने उबरहंडेंना लघुउद्योगासाठी अण्णाभाऊ पाटील महामंडळात कर्ज मिळत असल्याचे सांगितले. साक्षी आपल्याला पंधरा लाखांचे कर्ज मंजूर करून देईल, असेही म्हटले.

तीन महिन्यांपूर्वी उबरहंडेंनी साक्षीच्या सांगण्यावरून पत्नीच्या नावाने कर्जासाठी अर्ज केला. त्यानंतर या कामासाठी माझे ४ लाख रुपये खर्च झाले. ते द्या, असा तगादा साक्षीने सुरू केला. ते ऐकताच उबरहंडे गडबडले. तेव्हा तिने धमकावणे सुरू केले. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी उबरहंडेंनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून साक्षीला ९० हजार रुपये रोख, एक लाख फोन पेवर पाठवले. १८ सप्टेंबर रोजी तिने पुन्हा १० हजार फोन पेवर मागवले.

दुसऱ्या दिवशी टोळीने प्लॉटच हडप केल्याचा कट रचला
कर्जासाठी अर्ज करताना उंबरहंडे यांनी त्यांचा एक प्लॉट असल्याचे साक्षीला सांगितले होते. तिने टिप्या व इतर दोघांसोबत तो प्लॉट हडपण्याचा डाव रचला. १६ सप्टेंबर रोजी तिने उबरहंडेंना कॉल करून एक तलाठी माझ्या ओळखीचे आहेत, ३० हजार रुपये घेऊन फेर करण्यासाठी या, मी करून देते असे म्हणत १८ सप्टेंबर रोजी सिडको एन-१ येथील क्रेझी बाइट हॉटेलवर कागदपत्रे घेऊन बोलावले. दुपारी तीन वाजता उबरहंडे तेथे गेले असता साक्षी, दीपक पाटील तेथे होते. साक्षीने कॉल करून टिप्यालाही बोलावून घेतले. टिप्या व त्याच्यासोबत आलेल्या अर्जुनने उबरहंडेंच्या गळ्याला चाकू लावला. “जल्दी से मॅडमके चार लाख चालीस हजार दे, नहीं तो हमेशा के लिये खतम कर दूंगा”, असे धमकावले.

त्यांच्या दुचाकीची चावी व मोबाइल हिसकावला. टिप्याने “तेरे पास मॅडम को अभी देने को चार लाख चालीस हजार रुपये नहीं है तो, अभीच प्लॉट की नोटरी मॅडम के नाम पे करदे नही तो सीधा काट दूंगा,’ अशी धमकी दिली. साक्षीने तोपर्यत त्यांच्या खिशातील १५ हजार रोख काढून घेतले. हा प्रकार पाहून उबरहंडेंचा मित्र गवळी पळून गेला. त्यानंतर उबरहंडेंना कारमध्ये बसवत टिप्याने नोटरीला बोलावून घेतले.‘उबरहंडे नोटरी करने को नही बोला तो, उसको समृद्धी रोडपर खतम कर देंगे और उसका अॅक्सिडेंट बता देंगे, असे टिप्याने अर्जुनला सांगितले. मग कारमध्ये बेदम मारहाण करत बराच वेळ शहरात फिरवले.

दीपक कार चालवत होता. काही वेळाने हायकोर्ट परिसरात कार नेत एका व्यक्तीला प्लॉटचे झेरॉक्स पेपर दाखवले. साक्षीच्या नावे बाँडवर करारनामा करून घेतला. मग ते क्रेझी बाइटला गेले. टिप्याने तेथे बाँडसाठीचे पाच हजारही उबरहंडेंकडून घेतले. उबरहंडे गयावया करून जिवंत सोडण्यासाठी विनंती करत होते तर ते चौघे हसत त्यांची खिल्ली उडवत होते. पोलिसांकडे गेला तर सर्व कुटुंबाची हत्या करण्याची धमकी देत टिप्याने उबरहंडेंना तत्काळ लातूरला जाण्यास सांगितले. ते दुचाकीवरुन निघाले. मात्र, ते पोलिसाकडे जातात का, हे पाहण्यासाठी टिप्या, साक्षीने त्यांचा झाल्टा फाट्यापर्यंत पाठलाग केला.

अशा प्रकारे प्रकरण उघड झाले
१८ सप्टेंबरपासून गुन्हे शाखेने टिप्याचा शोध घेणे सुरू केले. सहा दिवसांत त्याने पाच सिम कार्ड बदलले. सहा दिवसांत तो तीन जणांच्या सर्वाधिक संपर्कात राहत असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले. अधिक खोलात गेल्यावर साक्षी, दीपक व अर्जुनशी त्याचे लागेबांधे लक्षात आले. यातील मुलगी म्हणजे साक्षीने एका पोलिसाला म्हणजे उबरहंडेंना कॉल केल्याचे निष्पन्न झाल्यावर तपास अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी उबरहंडेंकडे विचारणा केल्यावर हा घटनाक्रम समोर आला.

त्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके, गजानन सोनटक्के, सहायक फौजदार नंदकुमार भंडारी यांनी तपास करत तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यासह विठ्ठल जवखेडे, किरण गावंडे, संजयसिंग राजपूत, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, विजय भानुसे, नितीन धुळे, संदीप बीडकर, लखन गायकवाड, परभत म्हस्के यांनी साक्षीसह टिप्याच्या साथीदारांना अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-१ परिसरातच टिप्याने १६ सप्टेंबर रोजी देखील एकाला लुटले. मात्र, त्याने देखील भीतीपोटी तक्रार दिली नाही. त्यामुळे त्याची पोलिसदरबारी नोंद झाली नाही.

कुख्यात गुंड टिप्या - अभियंता साक्षी - उबरहंडे कनेक्शन असे जुळले
टिप्यावर चार खून, असंख्य खुनाचे प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, लूटमार, मारहाण, धिंगाणा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो हर्सूल कारागृहातून जामिनावर बाहेर आहे. कारागृहात त्याची उबरहंडेंसोबत ओळख झाली. दुसरीकडे संगणक अभियंता असलेल्या साक्षी व जटवाडा भागात राहणाऱ्या गवळींची ओळख होती. मला गुंड, गुन्हेगारांचे आकर्षण असून अशा कुख्यात गुंडाला भेटण्याची तीव्र इच्छा असल्याचे तिने गवळीला सांगितले होते.

गवळी उबरहंडेंचा मित्र असल्याने त्यांनी टिप्याची साक्षीला भेट घालून द्या, अशी गळ घातली. उबरहंडेंनी स्वत:च्या पदाचा वापर करत साक्षीला टिप्याची भेट घालून दिली. दरम्यान, साक्षीने त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होतेच. पुढे तिची टिप्या व गँगसोबत मैत्री वाढली. एकत्र फिरणे, व्यसने सुरू झाली. याविषयी उबरहंडेंना माहिती नव्हती. १७ सप्टेंबर रोजी टिप्याने शिवाजीनगरमध्ये पोलिस व महिलेवर हल्ला केला. हे कळल्यावर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी उबरहंडेंकडून पैसे घेण्याचे ठरवले, असे तपासात समोर आले.

गुंडगिरी, गुन्हेगारीचे ग्लॅमर… सगळेच अडकले, तुरुंगात रवानगी
साक्षीने नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. काही महिन्यांपासून ती महामंडळात काम करत होती. सुशिक्षित, सधन कुटुंबातील असली तरी तिला वाईट संगत लागली. गुंडगिरी, गुन्हेगारीचे तिला ग्लॅमर वाटू लागले. ती व्यसनीही झाली. टिप्याचे साथीदार अर्जुन राजू पवार - पाटील, दीपक दसपुते-पाटील यांच्यावर मारहाण, लूटमार, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे सर्व पकडले गेले. टिप्या मात्र फरार झाला.

बातम्या आणखी आहेत...