आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वरुड तांडा शिवारात जवळ भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरकडा ते हिवरा मार्गावर वरुडतांडा शिवारात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ता. 27 दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. प्रभाकर बावगे (60), सुशीलाबाई प्रभाकर बावगे (55) असे मयतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील प्रभाकर बावगे व त्यांची पत्नी सुशीलाबाई बावगे हे दोघे जण आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर हिवरा येथून डोंगरकडा येथे बँकेच्या कामासाठी आले होते.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले असता वरुडतांडा जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला (एमएच-38-टी-3697)धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक हनुमंत नकाते, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी कंटेनर चालकाचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, मयत बावगे दांम्पत्याला तीन मुले असून ते शेती करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...