आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बन्सीलालनगरातील अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटचा दरवाजा गेल्या आठ दिवसांपासून बंद हाेता. इतके दिवस या फ्लॅटकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. मात्र, मंगळवारी (२३ मार्च) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तेथे राहणारे विजय माधव मेहंदळे (७०), त्यांच्या पत्नी माधुरी (६५) हे जग साेडून गेल्याचे अपार्टमेंटमधील लाेकांना कळले. नेहमी सर्वांशी हसतमुख बाेलणाऱ्या विजय यांची या आठ दिवसांत काेणी खबरबातही घेऊ नये, यापेक्षा दुर्दैव ते काेणते. त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या एकुलत्या मुलीने येण्यास असमर्थता दर्शवल्याने अखेर वेदांतनगर पाेलिसांनी या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काेराेना संसर्ग होऊ नये म्हणून विजय मेहंदळे फ्लॅटचा दरवाजा नेहमी बंद ठेवायचे. येता-जाता ते सर्वांशी हसून बोलायचे. त्यांच्या पत्नी माधुरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने वर्षभरापासून अंथरुणाला खिळून होत्या. विजय हे पत्नीची शुश्रूषा करून घरातली सर्व कामे करायचे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ते घराबाहेर पडले नाहीत. याची कुणी साधी चौकशीही केली नाही. मात्र, मंगळवारी दुपारी घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी शेजाऱ्यांना समजली. पदमपुरा भागातील मामा चौकात येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव देवतवाल यांनी ही माहिती पोलिसांना दिली. वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक देवकते आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मेहंदळे यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद हाेता.
पथकातील एका कर्मचाऱ्याने छतावर जाऊन गॅलरीत उतरून आत पाहिले असता मेहंदळे दांपत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी दरवाजा ताेडून पंचनामा करत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत दाखल केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक शंकर डुकरे करत आहेत.
साेरायसिसचा आजार : प्राथमिक माहितीनुसार विजय यांना सोरायसिसचा आजार जडला होता. त्यांचे साडू शहरात राहतात. मात्र, ते वयोवृद्ध आहेत. त्यांना एक मुलगा असून तोदेखील अमेरिकेत आहे. विजय हे वाल्मीमधून निवृत्त झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेल्या आठ दिवसांत त्यांना कुणी फाेन का केला नाही, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीची हेल्पलाइन पोहोचलीच नाही : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या कक्षाचे उद्घाटन केले. बहुतांश ज्येष्ठांचे मोबाइल क्रमांक या कक्षाकडे असल्याचे सांगण्यात आले होते. पोलिस कर्मचारी स्वत: ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांच्या समस्या जाणून घेणार होते. मात्र ही सरकारी योजनाही अभागी मेहंदळे दांपत्यापर्यंत पाेहाेचलीच नाही.
पाच दिवसांपूर्वी झाला असावा मृत्यू
विजय यांचा मृत्यू किमान ५ दिवसांपूर्वी झाला असावा. त्यांचा मृतदेह कुजला होता. त्यांच्यानंतर माधुरी यांनी प्राण साेडला असावा. कारण त्यांच्या मृतदेहाची अवस्था बरी होती. तपासात घरातल्या सर्व वस्तू जागेवर होत्या. त्यामुळे घातपाताचा संशय नाही. आधी विजय यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा. नंतर अंथरुणाला खिळून असलेल्या माधुरी यांना उपचार न मिळाल्यामुळे त्यांनी प्राण सोडले असावे. घाटीतील डाॅक्टरांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.
तुम्ही तातडीने या... पाेलिसांनी मुलीला कळवले, पण...
तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून तुम्ही तातडीने या, असा निराेप पाेलिसांनी अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीला दिला. पण, परिस्थितीमुळे मी येऊ शकत नाही, असे तिने कळवले. अखेर पोलिसांनीच मुखाग्नी देत या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले. ज्यांना आयुष्यभर सांभाळले, मित्र परिवार जाेडला, त्यातील काेणीच शेवटच्या क्षणी उपस्थित नसल्याचे पाहून पाेलिसांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.