आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेल्यावर गावी घेऊन जा':कोरोनाबाधित पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीने पळवला मृतदेह; नेमके काय घडले? जाणून घ्या नातेवाइक आणि प्रशासनाचे दावे

अमोल मुळे, बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतदेह उचलून नेले जात असताना सुरक्षा रक्षक किंवा स्टाफने अडवले कसे नाही याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही.
  • बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार; चौघांविरोधात गुन्हा दाखल

“मेल्यावर मला गावी घेऊन जा...’, अशी शेवटची इच्छा व्यक्त करणाऱ्या पत्नीचा मृतदेह प्रशासनाच्या परवानगीविनाच जिल्हा रुग्णालयातून पती व इतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कारासाठी गावी नेल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. याप्रकरणी शहर पोलिसांत पतीसह इतर नातेवाइकांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, मृतदेहाची अँटिजन चाचणी निगेटिव्ह आल्याने मृतदेह गावी घेऊन जात होतो, असा दावा नातेवाइकांनी केला. अखेर अर्ध्या रस्त्यातून हा मृतदेह पुन्हा बीडमध्ये आणून कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार केले गेले.

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व ऑक्सिजन पातळी खालावत असल्याने २८ दिवसांपासून बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार होते. डॉक्टरांनी बायपॅप लावून व उपचार करूनही अखेर पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ताब्यात देण्याची विनंती नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला केली. यासाठी मृतदेहाची दोन वेळा अँटिजन चाचणीही केली गेली. ती निगेटिव्ह आली. मात्र, यानंतरही दोन तास होऊन रुग्णालय प्रशासन काहीच सांगत नाही हे पाहून नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह घेऊन जीपमध्ये टाकला व गावी घेऊन गेले.

रुग्णालय प्रशासनाची धावपळ

नातेवाइकांनी मृतदेह नेल्याचे कळताच रुग्णालय प्रशासनाची धांदल उडाली. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर प्रशासन अंत्यसंस्कार करते. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. मृत महिलेच्या नातेवाइकांशी संपर्क केला गेला. अखेर गावाजवळ पोहोचलेला हा मृतदेह पुन्हा बीडला आणून कोराेना नियमावलीप्रमाणे अंत्यसंस्कार केले गेले. याप्रकरणी पतीसह इतर तिघांवर शहर पोलिसांत परिचारिकेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला गेला.

प्रशासनाकडून स्पष्टीकरण...

नातेवाइकांच्या मते मृतदेह पळवून नेला नाही तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सांगून घेऊन गेलो होतो. पण, प्रशासनाने विनंती करून बोलवून घेतले आणि सहकार्य केल्यानंतरही आमच्याविरोधात पोलिस कारवाई केली. यावर रुग्णालय प्रशासनाने आपली भूमिका मांडली. तरीही मृतदेह उचलून नेले जात असताना सुरक्षा रक्षक किंवा स्टाफने अडवले कसे नाही याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. सविस्तर माहिती घेऊन सांगता येईल असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेवटची इच्छाही अपुरी

माझी बहीण २८ दिवसांपासून जगण्यासाठी संघर्ष करत होती. हळूहळू बरी होत होती. काल अचानक ती गंभीर झाली. माझी बहीण ‘मला मेल्यावर गावी घेऊन जा’ हे सांगत होती. म्हणून आम्ही तिच्या मृतदेहाची दोन वेेळा अँटिजन चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. दोन तास परवानगी मिळवण्यासाठी आम्ही धडपड केली, पण प्रतिसाद मिळाला नाही. तिची शेवटची इच्छा म्हणून आम्ही मृतदेह घेऊन जात होतो. पण, प्रशासनाच्या सूचना आल्यानंतर परत बीडला येऊन अंत्यसंस्कार केले. अशी भावना मृत महिलेचे भाऊ सुभाष कबाडे यांनी व्यक्त केली.

सीएस, एसीएसविरोधात पोलिसांत तक्रार

या प्रकरणात मृत महिलेचे भाऊ सुभाष कबाडे यांनी सोमवारी सायंकाळी शहर पोलिसांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. गुट्टेंसह इतरांवर मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा अशी तक्रार दिली. आयसीएमआरच्या सूचनेनुसार १० दिवसानंतर कोरोनाबाधितांना सुटी दिली जाते चाचणीची आवश्यकता नसते. बहिणीला अॅडमिट होऊन २२ दिवस होऊन गेले होते. दोन वेळा अॅन्टीजन चाचणीही केली ती निगेटिव्ह आल्याने एमओंच्या सूचनेनुसार मृतदेह नेला. तरी सीएस व एसीएसने अर्ध्या रस्त्यातून मृतदेहासह परत बोलावले व बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. यात मृतदेहाची अवहलेना झाली.असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

व्हिडिओ - रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...